… तर हवेली बाजार समितीची निवडणूक स्वबळावर लढणार; काँग्रेस कार्यकर्त्यांचा निर्धार | पुढारी

... तर हवेली बाजार समितीची निवडणूक स्वबळावर लढणार; काँग्रेस कार्यकर्त्यांचा निर्धार

खडकवासला : राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेसोबत (ठाकरे गट) सन्मानकारक आघाडी न झाल्यास हवेली तालुका बाजार समितीची निवडणूक स्वबळावर लढविण्याचा निर्धार काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केला आहे. काँग्रेसच्या जिल्हा सहकार आघाडीचे अध्यक्ष लहू निवंगुणे म्हणाले, ‘बाजार समितीच्या निवडणुकीत पूर्ण ताकदीने महाविकास आघाडीने उतरावे असे प्रयत्न सुरू आहेत. तालुक्यात काँग्रेसला मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे या निवडणुकीत काँग्रेसला योग्य प्रतिनिधित्व मिळावे; अन्यथा स्वबळावर निवडणूक लढविण्याचा निर्धार काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.’

दरम्यान, बाजार समितीच्या निवडणुकीबाबत काँग्रेस नेते, आमदार संग्राम थोपटे व जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष, आमदार संजय जगताप यांच्या उपस्थित तालुक्यातील पदाधिकार्‍यांची बैठक झाली. प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग चव्हाण पाटील, देविदास भन्साळी, निवंगुणे, शिवदास काळभोर, संदिप बांदल, कमलाकर सातव, रमेश खांदव आदी या वेळी उपस्थित होते.

Back to top button