पुणे : आरटीईच्या विद्यार्थ्यांना कोरोनापूर्वीचे शुल्क | पुढारी

पुणे : आरटीईच्या विद्यार्थ्यांना कोरोनापूर्वीचे शुल्क

पुणे; पुढारी वृत्तसेवा : आरटीईच्या विद्यार्थ्यांची शुल्क प्रतिपूर्ती ही पुन्हा एकदा पूर्वीप्रमाणेच करण्यात आली आहे. त्यानुसार आता शाळांना 2019-20 च्या दराप्रमाणे 17 हजार 670 रुपये प्रतिविद्यार्थी शुल्क प्रतिपूर्ती दिली जाणार आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या अगोदर असलेल्या दरानुसारच हा दर करण्यात आला आहे. सध्याच्या शैक्षणिक वर्षात शाळा नियमितपणे सुरू झाल्याने शुल्क प्रतिपूर्तीचा दर पूर्ववत करण्याचा निर्णय घेण्यात आला.

शाळांना 17 हजार 670 रुपये प्रतिविद्यार्थी शुल्क प्रतिपूर्ती दिली जाणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. 2020-21 मध्ये करोनाच्या प्रादुर्भावामुळे शाळा बंद असल्याने शुल्क प्रतिपूर्तीचा दर कमी करून आठ हजार रुपये प्रतिविद्यार्थी करण्यात आला होता. 2021-22 या शैक्षणिक वर्षातही करोना प्रादुर्भाव कायम राहिल्याने शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्तीचा दर सुधारित करण्यात आला नाही. शालेय शिक्षण विभागाने या संदर्भातील शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे.

या बाबींची पडताळणी करण्याच्या सूचना

  • आरटीईअंतर्गत 25 टक्के राखीव जागांवर प्रवेश दिलेल्या शाळांनी पहिली ते आठवीच्या शुल्काचा तपशील सरल किंवा आरटीई संकेतस्थळावर जाहीर केलेला असावा.
  • आरटीई मान्यता असल्याचे प्रमाणपत्र जोडावे.
  • सोडत पद्धतीने ज्या शाळेत प्रवेश मिळाला आहे त्याच शाळेत विद्यार्थी शिकत आहे, याची खात्री सरल आणि आरटीई संकेतस्थळावरून करून घ्यावी.
  • प्रत्यक्ष विद्यार्थिसंख्येपैकी केवळ 25 टक्के विद्यार्थिसंख्या शुल्क प्रतिपूर्तीसाठी ग्राह्य धरले जाणार आहे.

आरटीईतील कलम 12 (2)मधील तरतुदीनुसार जमीन, इमारत, इतर साधनसामग्री, सुविधा मोफत किंवा सवलतीच्या दरात प्राप्त झाल्याने ज्या शाळांना विशिष्ट संख्येतील बालकांच्या मोफत शिक्षणाची अट घालण्यात आली आहे, त्या शाळा बालकांच्या विशिष्ट संख्येच्या मर्यादेपर्यंत शैक्षणिक शुल्काच्या प्रतिपूर्तीसाठी हक्कदार असणार नाहीत, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

Back to top button