पुणे : ब्रेनडेड तरुणाच्या अवयवदानामुळे पाच रुग्णांना नवसंजीवनी | पुढारी

पुणे : ब्रेनडेड तरुणाच्या अवयवदानामुळे पाच रुग्णांना नवसंजीवनी

पुणे : पुढारी वृत्तसेवा : ब्रेनडेड तरुणाच्या नातेवाइकांचा धाडसी निर्णय, डॉक्टरांची तत्परता, झेडटीसीसीचा पुढाकार आणि वेगाने हललेली सूत्रे, यामुळे पाच जणांना नवसंजीवनी मिळाली. ब्रेनडेड तरुणाचे हृदय, फुप्फुस, यकृत, मूत्रपिंड आणि स्वादुपिंड यांचे गरजू रुग्णांना अवयवदान करण्यात आले. तरुणाचे डोळेही दान करण्यात आले. आठ दिवसांपूर्वी 19 वर्षीय तरुण बारामतीतून मित्रांबरोबर दुचाकीवरून फलटणला जात असताना त्याचा अपघात झाला. त्याला तातडीने स्थानिक हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यानंतर डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयात हलविले. डॉक्टरांनी प्रयत्नांची शर्थ करूनही उपचारांना प्रतिसाद न दिल्याने त्याला ब्रेनडेड घोषित करण्यात आले.

तरुणाचे हृदय, फुप्फुस, यकृत डी. वाय. पाटील रुग्णालयात अवयवांच्या प्रतीक्षेत असलेल्या तीन रुग्णांना देण्यात आले, अशी माहिती विभागीय अवयव प्रत्यारोपण समन्वय समितीच्या समन्वयक (झेडटीसीसी) आरती गोखले यांनी दिली. सोलापूर येथील एका रुग्णामध्ये मूत्रपिंड प्रत्यारोपित करण्यात आले, अशी माहिती डीपीयू हॉस्पिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुनील राव यांनी दिली.

असे झाले प्रत्यारोपण…
हृदय 52 वर्षीय पुरुष, फुप्फुसाची जोडी ही 39 वर्षीय स्त्री, यकृत 53 वर्षीय पुरुषावर प्रत्यारोपित करण्यात आले. किडणी व स्वादुपिंड हे दोन्ही अवयव 35 वर्षीय पुरुषावर प्रत्यारोपित करण्यात आले. उरलेली दुसरी किडनी सोलापूरच्या अश्विनी सहकारी हॉस्पिटलमधील 47 वर्षीय पुरुषावर प्रत्यारोपित करण्यात आली.

Back to top button