वर्ष सरले मात्र खोरचा पूल काही होईना | पुढारी

वर्ष सरले मात्र खोरचा पूल काही होईना

खोर(ता. दौंड); पुढारी वृत्तसेवा : खोर येथील पुलाचे काम बंद पडून वर्ष झाले आहे. अद्यापही या कामाबाबतीत काहीच हालचाली झाल्या नाहीत. दौंडचे आमदार राहुल कुल यांनी दौंड सार्वजनिक बांधकाम विभागाला काम चालू करण्याच्या सूचना देवूनही अधिकारी काही खुर्च्या सोडण्यास तयार नसल्याचे चित्र आहे. आमदार राहुल कुल यांनी आमदार निधीतून या पुलाच्या कामाला मंजुरी दिली. तसेच 98 लाख 12 हजार 815 रुपये मंजूर करून कामाला सुरुवात केली होती. मात्र, काही तांत्रिक अडचणींमुळे हे काम बंद पडले.

परंतु याविषयी मार्ग काढून हे काम सुरू करावे, अशी मागणी खोर ग्रामस्थांनी आमदार कुल यांच्याकडे केली होती. त्यानुसार दौंड सार्वजनिक बांधकाम विभागाला पुलाच्या कामाच्या बाबतीतील अडचण दूर करून काम सुरू करण्याच्या सूचना दिल्या. मात्र, ओढ्याला पाणी सुरू असल्याचे सतत कारण पुढे करून बांधकाम विभाग कामाच्या बाबतीत चालढकल करीत आहे.

खोरचा यात्रोत्सव 16 मार्च रोजी आहे. परिसरातील सर्वांत मोठी यात्रा असते. मात्र, भांडगावकडे जाण्यासाठी दुसरा रस्ताच नसल्याने बंद पडलेल्या पुलाच्या कामामुळे आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निष्काळजीपणामुळे मोठा मनस्ताप यात्रेच्या कालावधीत खोरकरांना होणार आहे. कारण मोठा वाहतूक कोंडीचा प्रश्न उभा राहणार आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाला याबाबत खोरच्या नागरिकांनी फोन करून विचारले असता त्यांच्याकडून फक्त उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत. ओढ्याच्या पाण्याचे कारण सांगून याबाबतीत चालढकल होत आहे. आता ओढ्यातील पाणी कमी झाले असून, ओढ्याच्या पाण्याचा आणि पुलाच्या कामाचा काहीच संबंध नाही. पायामधील काम पूर्ण झाले आहे. यात्रेच्या तोंडावर पर्यायी रस्ता काढून देणार असल्याचे बांधकाम विभागाने सांगितले आहे. मात्र, त्यांना काम सुरू करण्यास काही वेळ नाही ही मोठी शोकांतिका आहे.

Back to top button