पुणे : गृहप्रकल्पातील सदस्यांना 38 वर्षांनंतर मिळाला मालकी हक्क | पुढारी

पुणे : गृहप्रकल्पातील सदस्यांना 38 वर्षांनंतर मिळाला मालकी हक्क

पुणे; पुढारी वृत्तसेवा : ताडीवाला रस्त्यावर असलेल्या सिटी सर्व्हे नंबर सातमधील फायनल प्लॉट नंबर 113 मधील ‘न्यू जवाहर अपार्टमेंट सहकारी संस्थे’ने निवासी बांधकाम प्रकल्पाची संस्था स्थापन केली. 1985 मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेचे फेब—ुवारी 2023 मध्ये खरेदीखत झाले आहे. त्यामुळे, संस्थेच्या स्थापनेनंतरही मालकी हक्कांपासून वंचित असलेल्या गृहप्रकल्पातील सभासदांना तब्बल 38 वर्षांनंतर न्याय मिळाला आहे.

न्यू जवाहर अपार्टमेंट सहकारी संस्थेचा हा गृहप्रकल्प ‘मे. आर. जी. सचदेव अ‍ॅण्ड असोसिएटस’ यांनी 1985 मध्ये पूर्ण केला. त्याची संस्था स्थापन झाल्यानंतर चार महिन्यांच्या आत संस्थेचे खरेदीखत करून देणे महाराष्ट्र मालकी हक्कांच्या सदनिकाबाबत अधिनियम 1963 (मोफा कायदा) नुसार विकसकावर बंधनकारक आहे.

मात्र, संस्थेस खरेदीखत (कन्व्हेयन्स डिड) करून न दिल्याने सभासदांना मालकी हक्का मिळालेला नव्हता. खरेदीखत करून घेण्यासाठी संस्थेने अ‍ॅड. गणेश चव्हाण यांच्यामार्फत जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, पुणे शहर येथे अर्ज केला. या अर्जावर वेळोवेळी सुनावणी होऊन जिल्हा उपनिबंधकांनी न्यू जवाहर अपार्टमेंट सहकारी संस्थेच्या नावे हस्तांतरित (डिम्ड कन्व्हेयन्स) खरेदीखतासंबंधीचे आदेश व प्रमाणपत्र जारी केले.

मोफा कायद्यानुसार विकसकाने संस्था नोंदणीनंतर चार महिन्यांच्या आत संस्थेचे खरेदीखत (कन्व्हेअन्स डिड) करून देणे कायद्यानुसार बंधनकारक आहे. मात्र तरी विकसक खरेदीखत करून देत नसल्याचे काही प्रकार घडतात. असे असले तरी डिम्ड कन्व्हेअन्सव्दारे संस्थेला मालकी मिळविता येते.

                                           – अ‍ॅड. गणेश चव्हाण, संस्थेचे वकील.

Back to top button