महाळुंगे पडवळ : दहा एकरांवरील वनसंपदा जळाली | पुढारी

महाळुंगे पडवळ : दहा एकरांवरील वनसंपदा जळाली

महाळुंगे पडवळ; पुढारी वृत्तसेवा : मंचर-कळंब वनपरिक्षेत्रातील महाळुंगे पडवळ गावाजवळील सुपदेव व महादेव डोंगराला लागलेल्या आगीत दहा एकर परिसरावरील वनसंपदा जळाली. वार्‍यामुळे आग चास, गिरवली, कडेवाडी, फुलेवाडी, महाळुंगे पडवळ डोंगर परिसरात पसरली. वाळलेले गवत व काटेरी झुडपांमुळे आग पसरली. स्थानिक ग्रामस्थ, शेतकरी व वनपरिक्षेत्र अधिकारी, वनपाल शशिकांत मडके, वनरक्षक रईस मोमीन, वनमजूर सुदाम वाळुंज व कर्मचारी यांनी आग आटोक्यात आणली. सुमारे दोन दिवस आग धुमसत होती. आग शाळकरी मुलांनी लावल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये होती.

नांदूर, विठ्ठलवाडी परिसरात काही शेतकर्‍यांनी शेतातील बांध पेटवल्यामुळे वनक्षेत्रात आग लागल्याचे समजते. या परिसरातील दोन शेतकर्‍यांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे वन अधिकार्‍यांनी सांगितले. डोंगरावर पावसाळ्यात चांगले गवत यावे म्हणून वाळलेले गवत जाळले जाते, असे मेंढपाळ, गुराख्यांकडून सांगण्यात येत आहे. याबाबत वन अधिकार्‍यांनी स्थानिक ग्रामस्थ व मेंढपाळ गुराखी यांच्याशी चर्चा करून गैरसमज दूर करणे गरजेचे असल्याचे मत शेतकर्‍यांनी व्यक्त केले.

Back to top button