Lok sabha Election 2024 Results : तब्‍बल १० वर्षानंतर काँग्रेस मुख्‍यालयाने अनुभवला उत्‍साह

Lok sabha Election 2024 Results : तब्‍बल १० वर्षानंतर काँग्रेस मुख्‍यालयाने अनुभवला उत्‍साह

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : लोकसभा निवडणूक निकालाचे कल आज दुपारी स्‍पष्‍ट होवू लागले. काँग्रेस १०० जागांपेक्षा अधिक जागांवर तर इंडिया आघाडीने २३४ जागांवर आघाडी घेतली आहे. या यशाने अकबर रोडवरील काँग्रेस पक्ष मुख्यालयात कार्यकर्त्यांची गर्दी वाढत गेली. प्रमुख नेत्यांनीही कार्यालय गाठले. तब्बल दहा वर्षांनंतर काँग्रेस मुख्यालयात असा उत्साह बघायला मिळाला.

लोकसभा निवडणूक निकालाचे कल आज दुपारी हाती आल्यावर भाजप स्वबळावर बहुमताचा आकडा गाठू शकत नसल्याचे आणि काँग्रेसने जागांची शंभरी गाठल्याचे स्पष्ट होताच राजधानी दिल्लीत भाजपच्या गोटात निराशेचे वातावरण पसरले. मात्र, काँग्रेसला अपेक्षेपेक्षा जास्त जागा मिळत असल्याचे लक्षात येताच या पक्षात उत्साहाचे वातावरण बघायला मिळाले.

एनडीए आघाडी ३०० जागांवर पुढे असल्याचे दिसताच दीनदयाळ उपाध्याय मार्गावरील भाजपच्या मुख्यालयात ढोलताशे वाजत होते. मात्र, त्याठिकाणी कार्यकर्त्यांची फारशी गर्दी दिसून आली नाही. उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाने भाजपला मागे टाकल्याचे चित्र दिसताच भाजपचे नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये निराशा पसरली. निवडणूक निकालात भाजपला मोठा विजय मिळणार असल्याच्या खात्रीने भाजप मुख्यालयात बुंदीचे लाडू वळविले जात होते. मात्र, भाजप व एनडीएचे सरकार स्थापन होण्यात अनिश्चितता असल्याचे बघून लाडू वळविणे थांबविण्यात आले. तयार झालेले लाडूही पॅक करून ठेवण्यात आले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news