पुणे : न्यायालय आवारातील वॉटर कूलर, रांजण उरले नावापुरते ! घोटभर पाण्यासाठी कॅन्टीनची वाट | पुढारी

पुणे : न्यायालय आवारातील वॉटर कूलर, रांजण उरले नावापुरते ! घोटभर पाण्यासाठी कॅन्टीनची वाट

पुणे : पुढारी वृत्तसेवा : उन्हाचा कडाका वाढत असताना न्यायालयीन कामकाजासाठी आलेल्या नागरिकांना न्यायालयात घोटभर पाणीही मिळणे मुश्कील झाले आहे. न्यायालयातील वॉटर कूलर, रांजण धूळ खात पडले असून, पिण्याच्या पाण्यासाठी कॅन्टीनमध्ये जाऊन पैसे मोजून पाणी खरेदी करावे लागत आहे. यामध्ये सर्वाधिक हाल ज्येष्ठ नागरिकांचे होत असून, पक्षकारांना कोणी पाणी देता का पाणी…’ असे म्हणण्याची वेळ आली आहे. शिवाजीनगर येथील जिल्हा व सत्र न्यायालयात न्यायालयीन कामकाजासाठी दररोज हजारो लोकांची ये-जा असते. यामध्ये, न्यायालयीन कर्मचारी, पक्षकार व वकिलांचा समावेश असतो. न्यायालयीन कामकाजासाठी आलेल्या नागरिकांना स्वच्छ पाणी मिळावे, यासाठी न्यायालयाच्या प्रत्येक मजल्यावर वॉटर कूलर व प्युरिफायर बसविण्यात आले आहेत.

पिण्याच्या पाण्याची व्यवस्था चांगल्या ठिकाणी होणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात ते पुरुष व स्त्री स्वच्छतागृहांच्या बाहेर बसविण्यात आले आहे. काही महिन्यांपूर्वी स्वच्छतागृहांच्या घाणेरड्या वासाबरोबर पाणी पिण्याशिवाय पक्षकारांपुढे पर्याय नव्हता. याही परिस्थितीत ते आपली तहान भागवीत होते. मात्र, सद्य:स्थितीत न्यायालयातील पाण्याचे कूलर कित्येक महिन्यांपासून बंद असून, धूळ खात पडले आहे. बहुतांश कूलरच्या पाणी पडणार्‍या भागात तंबाखू, तसेच गुटखा खाऊन थुंकल्याचे दिसून येत आहे. दुपारी उन्हाच्या चटक्याने हैराण झालेल्या पक्षकारांसह वकिलांना वॉटर कूलर बंद असल्याने घोटभर पाण्यासाठी न्यायालयाच्या कोपर्‍यामध्ये असलेल्या कॅन्टीनची वाट धरावी लागत आहे. न्यायालयीन कामकाजासाठी आलेल्यांना किमान स्वच्छ पाणी मिळेल, अशी अपेक्षा पक्षकारांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

न्यायालयात पाण्याचा प्रश्न अतिशय गंभीर आहे. अनेक ठिकाणी वॉटर फिल्टर असूनही ते बंद, नादुरुस्त आणि अडगळीत आहेत.त्यामुळे विकत पाणी घ्यावे लागते. प्रशासनाने पिण्याच्या पाण्याची सोय करील, अशी अपेक्षा आहे.
                          – भाग्यश्री गुजर-मुळे, माजी खजिनदार, पुणे बार असोसिएशन.

उन्हाळा लक्षात घेता पुणे जिल्हा न्यायालया मध्ये पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध नाही. पाण्याचे फिल्टर व कूलर दुरुस्त केल्यास न्यायालयात पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न सुटेल.
                                      – आकाश मुसळे, माजी सदस्य, पुणे बार असोसिएशन

Back to top button