पुणे जिल्ह्यात 1 हजार 687 सहकारी संस्थांच्या निवडणुका होणार | पुढारी

पुणे जिल्ह्यात 1 हजार 687 सहकारी संस्थांच्या निवडणुका होणार

पुणे; पुढारी वृत्तसेवा : राज्यात सहाव्या टप्प्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने नुकतेच दिले आहेत. त्यामध्ये पुणे जिल्ह्यातील 1 हजार 687 सहकारी संस्थांचा समावेश असून ‘अ’ वर्गातील बारामती तालुका दूध उत्पादक सहकारी संघाचाही समावेश असल्याची माहिती राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणातून मिळाली.

प्राधिकरणाने नुकत्याच 1 एप्रिल 2021 ते 31 डिसेंबर 2022 या कालावधीतील पात्र कृषी पतसंस्था व बहुउद्देशीय सहकारी संस्था वगळता अन्य इतर सर्व प्रकारच्या सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेस 1 मार्च 2023 पासून सुरुवात करून 30 जूनअखेरपर्यंत त्या पूर्ण कराव्यात, असे आदेश दिले आहेत.

20 हजार 642 सहकारी संस्थांपैकी पुणे जिल्ह्यातील 1 हजार 687 सहकारी संस्थांचा समावेश असल्याचे स्पष्ट करण्यात आले. पुणे जिल्ह्यातील प्रामुख्याने वर्गनिहाय आकडेवारी पाहता ‘अ’ वर्गातील एकाच संस्थेमध्ये बारामती दूध संघाचा समावेश आहे. ‘ब’ वर्गातील 118 संस्थांच्या निवडणुका होत आहेत. यामध्ये अर्बन बँका, पतसंस्था, कर्मचारी, पतसंस्था, खरेदी-विक्री संघ, औद्योगिक आणि ग्राहक संस्थांचा समावेश आहे.

Back to top button