Lok Sabha Election 2024 : शिर्डीत ‘वंचित’मुळे शिवसेनेची वाट बिकट | पुढारी

Lok Sabha Election 2024 : शिर्डीत ‘वंचित’मुळे शिवसेनेची वाट बिकट

संदीप रोडे

लोकसभा निवडणुकीत शिर्डीच्या मैदानात वंचित बहुजन आघाडीने उमेदवार दिल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांची वाट बिकट झाली आहे. काँग्रेसचा हात सोडून उत्कर्षा रुपवते यांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला अन् लगोलग त्यांना उमेदवारी देण्यात आली. रुपवते यांच्या उमेदवारीने महाविकास आघाडीची मतविभागणी होणार असल्याने वाकचौरे यांची अडचण झाल्याचे चित्र आहे. दुसरीकडे शिवसेनेचे (शिंदे गट) खा. सदाशिव लोखंडे यांच्यासाठी महायुतीचे कार्यकर्ते सरसावले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वत: लोखंडे यांच्यासाठी शिर्डीत दिवसभर तळ ठोकून होते. मंत्री दादा भुसे यांच्यावर लोखंडे यांच्या प्रचाराची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यासोबतच महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांची यंत्रणा लोखंडेंसाठी संजीवनी ठरू पाहत आहे.

अकोले, संगमनेर, शिर्डी, कोपरगाव, श्रीरामपूर आणि नेवासा विधानसभा मतदार संघांतील 16 लाख 77 हजार मतदार शिर्डीचा खासदार ठरविणार आहेत. शिर्डीत लोखंडे विजयाची हॅट्ट्रिक करण्याची तयारी करत असतानाच गेल्या दहा वर्षांत घटलेला जनसंपर्क आणि सतत मुंबई, दिल्लीतील वास्तव्याच्या मुद्द्याने विरोधकांनी लोखंडे यांची कोंडी केली आहे. शिवसेना-काँग्रेस-भाजप अन् पुन्हा शिवसेना असा राजकीय प्रवास केलेल्या वाकचौरे यांचा अजूनही ‘गद्दारी’चा शिक्का पुसता पुसत नाही. वाढत्या वयाचा मुद्दाही त्यांची डोकेदुखी ठरू पाहतो आहे.

अशातच उत्कर्षा रुपवते या ‘वंचित’कडून शिर्डी लोकसभेच्या मैदानात उतरल्या आहेत. उत्कर्षा या ज्येष्ठ आंबेडकरवादी नेते दादासाहेब रुपवते आणि विधानसभेचे माजी अध्यक्ष मधुकरराव चौधरी यांची नात, तसेच प्रेमानंद रुपवते यांच्या कन्या आहेत. त्यांनी गेल्या सोळा वर्षांत काँग्रेसमध्ये अनेक महत्त्वाची पदे भूषविली आहेत. काँग्रेसचा राजीनामा दिला, त्यावेळी त्यांच्याकडे पक्षाच्या प्रदेश महासचिवपदाची जबाबदारी होती. शिवाय त्या राज्य महिला आयोगाच्या सदस्यही आहेत. राजकीय पक्षाकडून प्रथमच बौद्ध उमेदवार दिल्याचा मुद्दा रुपवते यांनी तापविला आहे. लोखंडे-वाकचौरे दोघेही अकार्यक्षम कसे? हा मुद्दा रुपवते पटवून देत असल्याने अन् मतदारही त्यांना प्रतिसाद देत असल्याने त्या कोणाची मते घटवितात की इतिहास घडवितात, याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे.

शिर्डीत उद्धवसेना आणि शिंदेसेनेतील लढत दोन्ही बाजूंनी प्रतिष्ठेची करण्यात आली आहे. भाजपचे मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांचा शिर्डी विधानसभा मतदारसंघ शिर्डी लोकसभेंतर्गत येत असल्याने त्यांचीही प्रतिष्ठा पणाला लागली आहे. सुरुवातीच्या काळात मंत्री विखे हे लोखंडे यांच्या प्रचारात सक्रिय झाल्याचे दिसले; पण आता ते नगर दक्षिणेत चिरंजीवाच्या प्रचारात गुंतले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिर्डीत येऊन गेले. मुख्यमंत्री शिंदे यांनी तर कार्यकर्ते व समाजघटकांची बैठक घेत लोखंडे यांची वाट सुकर करण्याचा प्रयत्न केला.

आदित्य ठाकरे सोडले तर भाऊसाहेब वाकचौरे यांच्यासाठी महाविकास आघाडीचा बडा नेता अजूनही शिर्डीत आलेला नाही. त्यातच वंचितच्या उमेदवार रुपवते या पूर्वाश्रमीच्या काँग्रेसी असल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांकडे संशयाच्या नजरेने पाहिले जात आहे. उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी रुपवते यांनी केलेले शक्तिप्रदर्शन, प्रचारादरम्यान मांडलेले विकासाचे मुद्दे पाहता ‘वंचित’ने प्रचारात रंगत आणली आहे.

पुनर्रचनेत अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव झालेल्या शिर्डी मतदार संघातून 2009 मध्ये पहिल्यांदाच रिपब्लिकन नेते रामदास आठवले रिंगणात उतरले होते. मात्र बौद्ध उमेदवार नको, अशा सांकेतिक भाषेत प्रचार करत त्यावेळी आठवलेंच्या विरोधात प्रचार झाला होता. अर्थात, त्यावेळी प्रेमानंद रुपवते हे बौद्ध उमेदवारही रिंगणात होते. पण आठवले विरुद्ध भाऊसाहेब वाकचौरे यांच्यातच प्रमुख लढत झाली. प्रचाराचा परिपाक म्हणून झालेला आठवलेंचा पराभव तेव्हा सगळ्याच बौद्ध समाजाच्या जिव्हारी लागला होता. त्यानंतर पहिल्यांदाच बौद्ध आणि मतदारसंघात मूळ असलेला प्रबळ उमेदवार रिंगणात उतरल्याने स्वागत होत असल्याचे दिसते. या अंगानेही उत्कर्षा रुपवते यांच्या उमेदवारीचा परिणाम लोखंडे आणि वाकचौरे यांच्या मतांवर होऊ शकतो, असे चित्र आहे.

सत्यजित तांबे, विवेक कोल्हे अजूनही अलिप्त

अपक्ष आमदार सत्यजित तांबे आणि भाजपचे युवा नेते विवेक कोल्हे अजूनही महायुतीच्या प्रचारापासून अलिप्त आहेत. तांबे हे माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरातांचे भाचे असून, काँग्रेस निलंबनानंतर ते विधान परिषदेची निवडणूक अपक्ष लढले अन् आमदार झाले. कोल्हे आणि विखे कुटुंबाचा राजकीय अबोला असल्याने कोल्हे सक्रिय नसल्याचे दिसते. कोल्हे यांचे विरोधक राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे यांना विखेंकडून पाठबळ दिले जात असल्याचा कोल्हे यांचा आरोप आहे. तांबे, कोल्हे यांची भूमिका गुलदस्त्यात असल्याने महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्यासमोर दोघांनाही सक्रिय करण्याचे आव्हान आहे.

Back to top button