पुणे : परीक्षार्थींचा टक्का वाढला, आजपासून बारावीची परीक्षा | पुढारी

पुणे : परीक्षार्थींचा टक्का वाढला, आजपासून बारावीची परीक्षा

पुणे; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) आजपासून (दि. 21) राज्यात बारावीची परीक्षा सुरू होणार आहे. परीक्षेसाठी यंदा गेल्या पाच वर्षांतील सर्वाधिक विद्यार्थी नोंदणी झाली असून, 3 हजार 195 मुख्य केंद्रांवर 14 लाख 57 हजार 293 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. परीक्षेच्या तयारीबाबत राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. मंडळाच्या सचिव अनुराधा ओक, माणिक बांगर यांच्यासह अन्य पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.

राज्यात 21 फेब्रुवारी ते 21 मार्च या कालावधीत बारावीची परीक्षा होत आहे. 10 हजार 388 कनिष्ठ महाविद्यालयांमधून परीक्षेसाठी नोंदणी झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये 7 लाख 92 हजार 780 मुले, 6 लाख 64 हजार 441 मुली आहेत. विद्यार्थ्यांवर परीक्षेचा मानसिक ताण येऊ नये, यासाठी दहा समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच, राज्य मंडळ आणि विभागीय मंडळात नियंत्रण कक्षाद्वारे हेल्पलाइनची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

गोसावी म्हणाले की, कोरोनाकाळात दिलेल्या सवलती यंदा रद्द केल्या आहेत. त्यामुळे प्रचलित पद्धतीने परीक्षा घेतली जाईल. कॉपीमुक्त अभियान राबविण्यासाठी यंदा पहिल्यांदाच उच्चस्तरीय बैठक झाली. परीक्षेच्या निर्धारित वेळेपूर्वी विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका आकलनासाठी दहा मिनिटे देण्याऐवजी परीक्षेच्या शेवटी दहा मिनिटे दिली जातील. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (सीबीएसई) विद्यार्थ्यांना वीस मिनिटे आधी दिली जातात. त्यामुळे पालक-विद्यार्थ्यांची मागणी लक्षात घेऊन निर्धारित वेळेनंतर दहा मिनिटे वाढवून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गैरप्रकार रोखण्यासाठी राबविल्या जाणार्‍या कृती कार्यक्रमासाठी विविध घटकांकडून 238 सूचना प्राप्त झाल्या. त्यातील काही सूचनांची अंमलबजावणी करण्यात आली आहे.

गैरप्रकार रोखण्यासाठी उपाययोजना
विभागीय मंडळ, जिल्हाधिकारी स्तरावरून प्रत्येक परीक्षा केंद्रावर भरारी आणि बैठे पथक
परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरातील झेरॉक्स सेंटर बंद ठेवणार
जीपीएसद्वारे सहायक परिरक्षकाकडील प्रश्नपत्रिकांच्या वाहतुकीवर लक्ष. प्रश्नपत्रिका वितरणापर्यंत मोबाईलद्वारे चित्रीकरण.
नव्या केंद्रांवर सीसीटीव्ही बंधनकारक.

…21 मार्चनंतर प्रात्यक्षिक परीक्षा
उच्च शिक्षण शिक्षकेतर कर्मचार्‍यांचा संप असला, तरी बारावीच्या विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक परीक्षा पूर्ण झाली आहे. मात्र, विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक परीक्षा झाल्या नसल्यास त्या 21 मार्चला लेखी परीक्षा संपल्यावर घेतल्या जातील, असे गोसावी यांनी स्पष्ट केले आहे.

संपाचा परीक्षेवर परिणाम नाही
शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्‍यांचा संप, परीक्षा कामकाजावर बहिष्काराच्या इशार्‍याबाबत गोसावी म्हणाले की, संघटनांशी चर्चा केली आहे. त्यांच्या मागण्यांतील काही मुद्दे धोरणात्मक असल्याने त्याबाबत शिक्षणमंत्र्यांकडून निर्णय घेतला जाईल. शिक्षणमंत्र्यांसोबतच्या चर्चेतून तोडगा निघेल, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे या संपाचा परीक्षेवर परिणाम होणार नाही.

शाखा नोंदणी झालेले विद्यार्थी
विज्ञान 6 लाख 60 हजार 780
कला 4 लाख 4 हजार 761
वाणिज्य 3 लाख 45 हजार 532
व्होकेशनल 42 हजार 959
टेक्निकल सायन्स 3 हजार 261
एकूण 14 लाख 57 हजार
293 विद्यार्थी

Back to top button