भोर : विकासकामावर काशिनाथराव खुटवड यांचा ठसा : खा. सुप्रिया सुळे | पुढारी

भोर : विकासकामावर काशिनाथराव खुटवड यांचा ठसा : खा. सुप्रिया सुळे

नसरापूर; पुढारी वृत्तसेवा : भोर-वेल्हे तालुक्यात फिरताना अनेक ठिकाणी स्वर्गीय काशिनाथराव खुटवड यांनी केलेल्या विकासकामाचे फलक आजही मी वाचते. यावरून त्यांचे नेतृत्व दिसून येते. त्यांच्या कार्यकाळात वरवे येथे लघुपाटबंधारे प्रकल्प करून वरवेसह या परिसरातील गावांच्या पाणी प्रश्नावर महत्त्वाचे काम केले. भोरमधील विकासकामावर खुटवड यांचा अजूनही ठसा असल्याचे गौरवोद्गार खासदार सुप्रिया सुळे यांनी काढले.

वरवे खु. (ता. भोर) येथील ग्रामपंचायत कार्यालयाचे भूमिपूजन खासदार सुळे यांच्या हस्ते झाले, त्या वेळी त्या बोलत होत्या. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजित शिवतरे, जिल्हा बँकेचे संचालक भालचंद्र जगताप, जिल्हा नियोजनचे माजी सदस्य विक्रम खुटवड, माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत बाठे, शलाका कोंडे, तालुकाध्यक्ष संतोष घोरपडे, गणेश निगडे, सरपंच नीलेश भोरडे, उपसरपंच रोहिणी कांबळे, ग्रामसेविका शाहीन इनामदार, माजी उपसरपंच महेंद्र भोरडे, सदस्य सागर कोंडे, मंदाकिनी काकडे, धनश्री गणोरे, माजी सरपंच रंजना भोरडे, रणजित कांबळे, संध्या भोरडे उपस्थित होते. विक्रम खुटवड म्हणाले की, वरवे गाव शहरीकरणाकडे जात आहे.

सर्वांनी राजकारणविरहित एकत्र येत गावविकास साधावा. शिवतरे म्हणाले की, भोर तालुक्यातील 34 गावांत ग्रामपंचायत कार्यालय होत आहे. जलजीवन योजनेसाठी तालुक्यात 247 पाणी योजना मंजूर केल्या असून, वरवे गावासाठी जवळपास 5 कोटींची पाणी योजना होत असल्याची माहिती त्यांनी दिली. या वेळी सरपंच नीलेश भोरडे व महेंद्र भोरडे यांनी गावचा महामार्ग ते गरडमाळ रस्ता, मंदिर सभामंडपासाठी निधीची मागणी केली.

कामाच्या श्रेयात कोणालाही डावलू नका
जिल्हा परिषद गटातील कार्यक्रमास डावलले जात असल्याबद्दल माजी जि. प. सदस्या शलाका कोंडे यांनी खंत व्यक्त केली. यावर खासदार सुळे म्हणाल्या, की गावासाठी पाणी योजना मंजूर झाली असून, यात राज्य व केंद्र शासनाचा तसेच सरपंच नीलेश भोरडे, जिल्हा परिषद सदस्या शलाका कोंडे तसेच तत्कालीन अर्थमंत्री अजित पवार, खासदार व केंद्रातील मंत्र्यांपर्यंतचे योगदान आहे. त्यामुळे कामाच्या श्रेयात कोणालाही डावलू नका, असे आवाहन सुळे यांनी केले.

Back to top button