पुणे : कॉसमॉस बँकेत आग | पुढारी

पुणे : कॉसमॉस बँकेत आग

पुणे; पुढारी वृत्तसेवा : टिळक रस्त्यावरील कॉसमॉस बँकेच्या शाखेत शुक्रवारी (दि.18) मध्यरात्री आग लागली. आगीत बँकेतील कॅशकाऊंटर कक्ष, फर्निचर, पैसे मोजायचे यंत्र, संगणक, खुर्ची असे साहित्य जळाले. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची शक्यता अग्निशमन दलाकडून व्यक्त करण्यात आली आहे.

टिळक रस्त्यावर पाच मजली इमारतीत तळमजल्यावर कॉसमॉस बँकेची शाखा आहे. मध्यरात्री तळमजल्यावरून मोठ्या प्रमाणावर धूर येत असल्याची माहिती अग्निशमन दलाला कळविण्यात आली. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. कॉसमॉस बँकेच्या शाखेत कोणी अडकले नसल्याची खात्री करण्यात आली. अग्निशमन दलाचे अधिकारी गजानन पाथ्रुडकर, बजरंग लोखंडे, ज्ञानेश्वर खेडेकर, संजय जाधव, नीलेश माने, किशोर बने, राकेश नाईकनवरे यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले.

पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली. बँकेच्या शाखेत मोठ्या प्रमाणावर धूर झाला होता. जवानांनी काचा फोडून धुराला वाट करून दिली. आगीत बँकेतील रोखपाल कक्ष, फर्निचर, पैसे मोजणी करण्याचे यंत्र, संगणक, खुर्ची असे साहित्य जळाले. बँकेत शॉर्टसर्किट झाल्याने आग लागल्याची शक्यता अग्निशमन दलाने व्यक्त केली.

डेक्कन जिमखाना भागात घरात आग
डेक्कन जिमखाना भागात गोखले इन्स्टिट्यूटजवळ असलेल्या बैठ्या घरात पहाटे आग लागली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे दोन बंब घटनास्थळी दाखल झाले. बैठ्या कौलारू घरात कोणी नसल्याचे लक्षात आल्यानंतर जवानांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. आगीत कौलारू छत, गृहोपयोगी वस्तू, वायरिंग जळाले. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची शक्यता अग्निशमन दलाने व्यक्त केली. अग्निशमन दलाचे केंद्रप्रमुख राजेश जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली जवानांनी 15 मिनिटांत आग आटोक्यात आणली.

 

Back to top button