पुणे : 41 सुळक्यांवर यशस्वी चढाई | पुढारी

पुणे : 41 सुळक्यांवर यशस्वी चढाई

पुणे; पुढारी वृत्तसेवा : गिरीप्रेमी गिर्यारोहण संस्थेच्या चाळिसाव्या वर्षपूर्ती व 41 व्या वर्षात पदार्पण निमित्ताने संस्थेतील गिर्यारोहकांनी 41 सुळक्यांवर यशस्वी चढाई केली. गिर्यारोहक एव्हरेस्ट शिखरवीर कृष्णा ढोकले यांच्या नेतृत्वाखाली 5 फेब्रेवारी 2022 रोजी सुरू झालेल्या या मोहिमेची 12 फेब्रेवारी 2023 रोजी तैल बैलाच्या प्रस्तरभिंतीवर यशस्वी चढाई करून सांगता झाली.

या मोहिमेदरम्यान त्यांनी 41 पैकी 31 सुळक्यांवर नव्याने मार्ग खुला करत चढाई केली. किल्ले सुधागड, सरसगड, चंदेरी, अंजनेरी, र्त्यंबकेश्वर, ढाक बहिरी, जीवधन या किल्ल्यांच्या लगतचे सुळके; तर म्हैसमाळ, बदलापूर व-हाड, खोडकोणा – मेथवण, माळशेज घाट, कर्जत, लिंगाणा, तासूबाई या सह्याद्रीतील दुर्गम  परिसरातील सुळक्यांवर गिरीप्रेमीच्या प्रस्तरारोहकांनी पारंपरिक पद्धतीने चढाई केली.

वेगवेगळ्या परिसरांतील, वेगवेगळ्या श्रेणींतील आणि वेगवेगळ्या उंचीच्या या 41 सुळक्यांवर, दोन टप्प्यांमध्ये एकूण 6085 फूट इतकी चढाई झाली. पहिल्या टप्प्यात 8 दिवसांमध्ये 24 सुळके, तर दुसर्‍या टप्प्यात 11 दिवसांमध्ये 17 सुळक्यांवरील चढाईत प्रामुख्याने पिटॉन, मेख, फ्रेंड, चोकनट, बॉलनट हे पारंपरिक प्रस्तरारोहण साहित्य वापरून या सर्व सुळक्यांवर चढाई करण्यात आली आहे.

या मोहिमेत चार प्रस्तरारोहक आणि पंधरा साहाय्यक असा 19 सदस्यांचा संघ होता. एव्हरेस्ट शिखरवीर कृष्णा ढोकले यांनी या मोहिमेचे नेतृत्व करत मुख्य आरोहणाची जबाबदारी पार पाडली. सोबत बिलेयर सचिन शहा, प्रशांत पाटील, डॉ. प्रमोद पाटील यांनी लीड क्लाइंम्बिंग पद्धतीने या सुळक्यांवर चढाई केली. तर इतर सदस्यांनी जुमारिंग पद्धतीचा वापर केला. डॉ. गुरुप्रसाद कुलकर्णी यांनी प्रथमोपचार तज्ज्ञ म्हणून, तर रविराज देशपांडे यांनी प्रस्तरारोहण साहित्य नियोजनामध्ये आपले योगदान दिले.

महेश खराडे आणि अनिल भेसके यांनी बेस कॅम्प मॅनेजरची जबाबदारी पार पडली. यांच्यासोबतच राजेंद्र नाना मोरे, ओंकार बुरडे, महेश बोराटे, प्रतीक बाजारे, समीर देवरे, दत्तात्रय चौधरी, अभिजित करवंदे, शिवाजी शिंदे, ओंकार करंजुले, श्रवणकुमार, डॉ. उदय झेंडे यांनीही या मोहिमेत योगदान दिले. तर पिंपरी-चिंचवड माउंटेनिअरिंग क्लबचे सहकार्य लाभले. या मोहिमेला गिरीप्रेमीचे ज्येष्ठ गिर्यारोहक व शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित उमेश झिरपे यांचे मार्गदर्शन लाभले.

Back to top button