उंडवडी : यंदा गव्हाचे उत्पादन वाढणार | पुढारी

उंडवडी : यंदा गव्हाचे उत्पादन वाढणार

उंडवडी; पुढारी वृत्तसेवा : बारामती तालुक्यासह जिरायती भागातील उंडवडी क. प. परिसरामध्ये सध्या गव्हाचे पीक जोमदार आले आहे. दरवर्षीच्या तुलनेत यंदा उत्पन्नही जादा होण्याची चिन्हे असल्याने शेतकर्‍यांनी समाधान व्यक्त केले. उंडवडी क. प. परिसरात यंदा चांगला पाऊस झाला. त्याचा फायदा रब्बी हंगामातील पिकांना झाला. त्यात थंडीही वेळेवर पडल्याने गव्हाची वाढ चांगली झाली. रोगमुक्त व जोमदार पीक आले आहे. परिणामी, पिकाला चांगला उतारा येणार आहे. दरवर्षीच्या तुलनेत यंदा गव्हाचे उत्पादन जास्त होण्याची शक्यता आहे.

उंडवडी, सुपे परिमंडलात एकूण पेरणी गहू क्षेत्र 15.27 हेक्टर आहे. रब्बीच्या 11.12 टक्के क्षेत्रावर गव्हाची पेरणी झाली आहे. यंदा गारपीट झाली नाही शिवाय पिकावर तांबोरा न पडल्याने गहू पीक जोमात आहे. उत्पादनही दर्जेदार होईल, असे कृषी मंडल अधिकारी अरविंद यमगर व कृषी पर्यवेक्षक किसन काझडे यांनी सांगितले. यंदा गव्हाच्या पिकाची वाढ चांगली झाली आहे. यंदा पिकाला उतार चांगला असणार आहे. शिवाय पिकाला उंदीर न लागल्याने नुकसान झाले नाही. एकरी 17 क्विंटल उत्पादनाची अपेक्षा आहे, असे शेतकरी स्वप्निल जराड यांनी सांगितले.

Back to top button