पुणे : नीचांकी भावामुळे कांदा उत्पादक हतबल ; भांडवलाच्या तुलनेत बाजारभाव कमी | पुढारी

पुणे : नीचांकी भावामुळे कांदा उत्पादक हतबल ; भांडवलाच्या तुलनेत बाजारभाव कमी

ओतूर : पुढारी वृत्तसेवा :  ओतूर कांद्याचे आगर म्हणून ओळख असलेल्या उत्तर पुणे जिल्ह्यातील क्षेत्रात अगाप कांदा काढणीला सुरुवात झाली आहे. बाजारभाव नीचांकी मिळत असल्याने शेतकरी हतबल झाला आहे. कांदालागवड करताना मजूर जमविणे, शेत तयार करणे, पाणी व्यवस्थापन, कांदारोप उपलब्धता, महागडी खते, औषधे व अंगमेहनतीच्या तुलनेत मिळणारा बाजारभाव अगदीच नगण्य आहे. रविवारी (दि. 12) ओतुर उपबाजारात प्रति 10 किलो गोळा कांदा – 120 ते 130, सुपर कांदा – 80 ते 130, गोल्टी – 40 ते 70 तर बदला कांदा 20 ते 70 रुपये बाजारभावाने विक्री झाल्याची माहिती उपबाजार कार्यालय व्यवस्थापक मस्करे यांनी दिली.

कांद्याला गेल्या तीन वर्षांत योग्य बाजारभाव मिळालेले नाही. याही वर्षी कांदा या पिकाला बाजारभाव मिळतीलच याची कोणतीही खात्री नसतानाही शेतकर्‍यांनी यंदाही कांदालागवड मोठ्या प्रमाणात केली आहे.  परतीच्या पावसाने अगाप कांदारोपे नष्ट झाली होती. बियाण्यांचा महागडा खर्च पेलून शेतकरी राजाने पुन्हा उभे राहण्याचा प्रयत्न केला. दुबार कांदारोपे जगवून यंदाचे पीक हातात पडेपर्यंतच्या कमालीचा त्रास शेतकर्‍यांनी सहन केला. या तुलनेत बाजारभाव द्या, अशी मागणी शेतकरीवर्गातून होत आहे. खते, औषधे, मजुरीचे, वाहतुकीचे, डिझेलचे वाढलेले दर यामुळे कांदा उत्पादित करताना एकरी 70 ते 80 हजार रुपये इतका खर्च होत आहे. लागवड खर्चाच्या तुलनेत कांद्याला बाजारभाव मिळत नसल्याने तसेच नैसर्गिक आपत्तीने शेतकरी कर्जबाजारी होऊ लागला आहे. याकडे शासनाने प्राधान्याने लक्ष द्यावे, अशी मागणी शेतकर्‍यांनी केली आहे.

Back to top button