पुणे : दोन महिन्यांत बदलले 28 हजारांवर नादुरुस्त रोहित्र | पुढारी

पुणे : दोन महिन्यांत बदलले 28 हजारांवर नादुरुस्त रोहित्र

पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज्यात गेल्या दोन महिन्यांत सुमारे 28 हजार 430 नादुरुस्त रोहित्र बदलण्यात आले आहेत. तर सद्य:स्थितीत गेल्या दोन दिवसांमध्ये नादुरुस्त झालेले 339 रोहित्रदेखील तत्काळ बदलण्यात येत आहेत. नादुरुस्त झालेले रोहित्र तत्काळ बदलून मिळत असल्याने राज्यातील शेतकर्‍यांना उत्पादन वाढीसाठी यंदा राज्य शासनाकडून मोठे पाठबळ मिळाले आहे. महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी विविध बैठकींद्वारे सर्व क्षेत्रीय कार्यालयांना नादुरुस्त रोहित्र तत्काळ बदलण्याची सक्त सूचना केली. तसेच रोहित्र दुरुस्तीच्या प्रक्रियेला व ऑईलच्या उपलब्धतेला वेग दिला.

यासह महावितरणचे संचालक (संचालन) संजय ताकसांडे यांनी राज्यभर दौरे करून आढावा घेत सर्व परिमंडलामध्ये नादुरुस्त रोहित्र बदलण्याच्या कार्यवाहीला आणखी वेग दिला. याची फलनिष्पती म्हणून यंदा महावितरणने आजवरची ऐतिहासिक कामगिरी केली आहे व गेल्या डिसेंबरमध्ये 17 हजार 785, जानेवारीमध्ये 8 हजार 404 व 8 फेब—ुवारीपर्यंत 2 हजार 241 असे एकूण 28 हजार 430 नादुरुस्त रोहित्र केवळ दोन ते तीन दिवसांच्या कालावधीत बदलले आहेत.

राज्यात कृषिपंपांना वीजपुरवठा करणारे महावितरणचे एकूण 7 लाख 54 हजार वितरण रोहित्र आहेत. विशेष म्हणजे नादुरुस्त रोहित्र बदलण्याच्या मोहिमेमुळे गेल्या सव्वादोन महिन्यांमध्ये नादुरुस्त रोहित्रांचे प्रतिदिवस प्रमाण केवळ 320 ते 325 वर आले आहे. यापूर्वी विविध कारणांमुळे राज्यात दररोज सुमारे 3 हजार ते 3 हजार 500 रोहित्र बदलणे शिल्लक राहात असल्याची स्थिती होती. सद्य:स्थितीत महावितरणकडे ऑईलसह सुस्थितीतील 4 हजार 312 रोहित्र उपलब्ध आहेत. तर राज्यात विविध ठिकाणी 1934 कंत्रांटदार एजन्सीकडे आणखी 11 हजार 656 रोहित्रांची दुरुस्ती वेगाने सुरू आहे.

गेल्या सव्वादोन महिन्यांमध्ये नादुरुस्त झालेले 28 हजार 430 रोहित्र बदलण्यात आले. त्यामध्ये औरंगाबाद परिमंडल- 1874, लातूर- 3548, नांदेड- 2893, अकोला- 3439, अमरावती- 1873, नागपूर- 203, गोंदिया- 621, चंद्रपूर- 460, बारामती- 4086, कोल्हापूर- 1414, पुणे- 586, जळगाव- 2403, नाशिक- 4719, कल्याण- 98, कोकण-175 आणि भांडूप परिमंडलातील 38 रोहित्रांचा समावेश आहे. नादुरुस्त झालेले रोहित्र बदलण्यासाठी नवीन रोहित्रांची वाहतूक व बदलण्याची कार्यवाही याची संपूर्ण जबाबदारी ही महावितरणची आहे.

Back to top button