पिंपरी: प्राथमिक शाळांत सॅनिटरी पॅड मशिनचा अभाव, 10 ते 12 वयोगटांतील मुलींसाठी सुविधा गरजेची | पुढारी

पिंपरी: प्राथमिक शाळांत सॅनिटरी पॅड मशिनचा अभाव, 10 ते 12 वयोगटांतील मुलींसाठी सुविधा गरजेची

पिंपरी (पुणे) : पिंपरी- चिंचवड महापालिकेच्या माध्यमिकच्या अठरा शाळांमध्ये सॅनिटरी पॅड मशीन बसविण्यात आले आहेत. मात्र, प्राथमिक शाळांतही 10 ते 12 वयोगट हा मासिक पाळी येण्याचा कालावधी असतो. या वयातील मुलींना अचानक मासिक पाळी आल्यास मधूनच घरी यावे लागते, त्यामुळे मुलींचे अभ्यासाचे नुकसान होते. महापालिकेच्या सर्व 107 प्राथमिक शाळेत सॅनिटरी पॅड मशीन नसल्याचे समोर आले आहे.

जागतिक तापमान वाढ किंवा वाढते प्रदूषण आणि खाण्यापिण्याच्या सवयी यामुळे मुलींना लवकर मासिक पाळी येते. इयत्ता 6 वी व 7 वी मध्ये शिकणार्‍या मुलींमध्येही मासिक पाळी येऊ शकते. अनेक वेळा शाळेत असताना मासिक पाळी आलेली कळत नाही. अशा परिस्थितीमध्ये मुलींकडे काहीही पर्याय नसतो. अशा परिस्थितीमध्ये मुलींची लाजीरवाणी अवस्थ होते. अशा वेळी पालकांना बोलावून घेणे किंवा त्यांना रिक्षासारख्या वाहनाने घरी सोडावे लागते. अशा बर्‍याच घटना शाळांमध्ये घडतात, असे शिक्षक सांगतात. पुरुष मुख्याध्यापक असल्यामुळे टॉयलेट, पाळी, पॅड या सर्व गोष्टी त्यांच्याशी बोलण्यासाठी खूप लाज वाटते. त्यामुळे आम्ही कधी बोललोच नाही, अशा प्रतिक्रिया काही विद्यार्थिंनीनी दिल्या.

पॅड वापरण्याच्या जनजागृतीचा उद्देश फोल

महापालिकेच्या शाळांमध्ये आलेल्या मुलींची आर्थिक परिस्थिती बेताची असते. त्यामुळे सॅनिटरी नॅपकिनचा खर्च परवडत नाही. याकरिता मनपाच्या 18 माध्यमिक शाळांमध्ये सॅनिटरी पॅड मशीन बसविण्यात आले आहेत. यामध्येही अकरा शाळांमध्ये हे मशीन नादुरुस्त स्थितीत आहे. त्यामुळे आरोग्याच्यादृष्टीने केलेली सॅनिटरी पॅड वापरण्याच्या जनजागृतीचा उद्देश फोल ठरत आहे.

पॅड मिळण्याची, बदलण्याची असुविधा

ज्या मुली पाळीच्या दिवसांमध्ये पॅड वापरतात, त्या शाळेच्या वेळात पॅड एकदाही बदलत नाहीत. कारण त्यांना पॅड बदलण्यासाठी सुरक्षित जागा मिळत नाही व पॅडची विल्हेवाट लावण्यासाठी त्यांच्याकडे सोय नसते. मेडिकल हे पॅड मिळण्याचे मुलींसाठी एकमेव ठिकाण असून तिथे जाऊन पॅड घेण्याची मुलींना लाज वाटते. मुलींना जर शाळेतच पॅड मिळाले तर सोयीचे ठरेल, असे विद्यार्थिनींनी सांगितले. तर, काही मुलींनी पॅड नष्ट करण्यासाठी डिस्पोजल मशीन पाहिजे असे सांगितले. सॅनिटरी पॅड मिळण्याची सुविधा व नष्ट करण्याच्या सुविधांची असमाधानकारक स्थिती असल्याचे काही मुलींशी बोलून समजले. त्यामुळे मासिक पाळीच्या दिवसांत मुलींचे शाळेत गैरहजर राहण्याचे प्रमाण वाढले आहे.

मनपाच्या प्राथमिक शाळांमध्येदेखील सॅनिटरी पॅड मशीनची आवश्यकता आहे. ही बाब पुढे आल्यानंतर आम्ही भांडार विभागाकडे मशीन बसविण्याची मागणी केली आहे.
– संदीप खोत, शिक्षण उपायुक्त

कोणत्याही शाळेमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे निकष म्हणजे भौतिक सुविधांची गरज, स्वच्छतागृह, पाणी, मैदान आणि मासिक पाळी व्यवस्थापनाच्या सुविधा, डिग्नीटी रुम हे आहेत. देणगी देणार्‍याकडून डिजिटल शाळांची मागणी केली जाते. पण भौतिक सुविधांचे काय? मुलींना दिवसभर पॅड बदलता येत नाही. पॅड बदलण्याची सुविधा नसेल तर संसर्ग होण्याची शक्यता असते. महिला बालकल्याण, आरोग्य विभाग व शिक्षण विभाग यातून जो काही निधी उपलब्ध होतो तो मासिक पाळी व्यवस्थापनासाठी वापरावा, अशी मागणी आम्ही केली होती. परंतु, प्रशासन उदासीन असल्यामुळे हा प्रश्न कोणासमोर मांडावा, असा प्रश्न आहे.
– प्रभा विलास, संस्थापिका, वर्क फॉर इक्वॅलिटी

Back to top button