पुणे : भाकरी महागली ! दरवाढीमुळे भाकरीत 50 पैसे ते एक रुपयांची वाढ | पुढारी

पुणे : भाकरी महागली ! दरवाढीमुळे भाकरीत 50 पैसे ते एक रुपयांची वाढ

पुणे : पुढारी वृत्तसेवा : बेसनपासून मांसाहारी पदार्थांवर ताव मारायचं म्हटलं की, गरमागरम ज्वारी अथवा बाजरीची भाकर ही ताटात हवीच हवी. जिभेचे चोचले पुरविणारी ज्वारी व बाजरीच्या दरात मोठी वाढ झाल्याने गृहउद्योगांमध्ये तयार होणारी भाकरीही महागली आहे. एरवीच्या तुलनेत भाकरीमागे 50 पैसे ते एक रुपयापर्यंत वाढ झाली आहे. परिणामी, एक भाकरी 7 रुपये 50 पैसे ते 8 रुपयांपर्यंत पोहोचली आहे. भाकरीच्या दरात वाढ झाल्याने शहरातील बहुतांश हॉटेल व खानावळचालकांनी गृहउद्योगाकडून मागविण्यात येणार्‍या भाकर्‍यांची संख्याही कमी केल्याचे चित्र आहे.

शहरात औद्योगिक वसाहती, व्यावसायिक संकुले, कामगार वसाहती, रेल्वे स्थानक परिसर आदी ठिकाणी अनेक लहान खानावळी आणि कॅण्टीन आहेत. छोटेखानी हॉटेल, कॅण्टीन तसेच खानावळींना ज्वारी, बाजरी भाकरींची आवश्यकता भासते. त्या पार्श्वभूमीवर शहरातील गृहउद्योगांमार्फत ज्वारी, बाजरीची भाकरी तसेच चपाती पुरविण्याचे काम करण्यात येते. चपाती अथवा भाकरीसाठी स्वतंत्र व्यक्ती ठेवण्यापेक्षा गृहउद्योगांमार्फत चपाती व भाकरी घेण्यास चालक प्राधान्य देतात.

मात्र, वाढत्या महागाईमुळे भाकरीत झालेली वाढ ही ग्राहकांना परवडणारी नसल्याने त्यांनी भाकरीऐवजी आपला मोर्चा चपातीकडे वळविला आहे. सद्य:स्थितीत गहूही महागला आहे. मात्र, ज्वारी व बाजरीच्या तुलनेत स्वस्त असल्याने छोटेखानी हॉटेल, कॅण्टीन तसेच खानावळचालकांनी चपातीचा पर्याय स्वीकारल्याचे दिसून येत आहे. गणेश कृपा महिला उद्योगचे चालक दिलीप रेणुसे म्हणाले, ‘मागील तीन महिन्यांपासून ज्वारी व बाजरीच्या भावात मोठी वाढ झाली. मागील दोन महिने भाकरीचे दर स्थिर होते. मात्र, ज्वारी व बाजरीचे दर चढेच राहिल्याने या महिन्यात भाकरीमागे 50 पैशांनी वाढ केली. भाकरीच्या दरात वाढ झाल्याने हॉटेलवाल्यांनी भाकरीची संख्याही कमी केली आहे. ज्वारी व बाजरीची दरवाढ होऊन उत्पादन कमी झाल्यास त्याचा आणखी परिणाम उद्योगावर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Back to top button