पुणे : 79 शाळांचा नन्नाचा पाढा ; पोर्टलवर माहिती भरण्यास उदासीनता | पुढारी

पुणे : 79 शाळांचा नन्नाचा पाढा ; पोर्टलवर माहिती भरण्यास उदासीनता

पुणे : पुढारी वृत्तसेवा : जिल्हा परिषद तसेच महापालिकेच्या शाळांना केंद्र सरकारच्या विविध योजनांसाठी युडायस प्लस पोर्टलवर शिक्षक, विद्यार्थी तसेच अन्य माहिती भरणे गरजेचे असते. परंतु संबंधित माहिती भरण्यासाठी शाळा टाळाटाळ करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्यातील 78 हजार 731 शाळांमधील शिक्षकांची माहिती अंतिम करण्यात आलेली नाही. तसेच 2 कोटी 20 लाख विद्यार्थ्यांपैकी 45 लाख विद्यार्थ्यांचीच माहिती भरण्यात आली आहे. त्यामुळे संबंधित माहिती भरण्यासाठी आता 15 फेब—ुवारीची अंतिम मुदत देण्यात आली आहे.

महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे राज्य प्रकल्प संचालक कैलास पगारे यांनी राज्यातील सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि महापालिकांच्या आयुक्तांना दिलेल्या निर्देशानुसार, भारत सरकार शिक्षा मंत्रालयाकडून समग्र शिक्षा योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी देशातील सर्व शाळांची माहिती ऑनलाइन पध्दतीने भरण्यासाठी युडायस प्लस प्रणाली विकसित केली आहे. युडायस प्लस प्रणालीमधील माहितीनुसारच समग्र शिक्षा, मिड-डे-मील योजना, शिष्यवृत्ती योजना आदी योजनांकरिता निधी मंजूर करण्यात येतो. त्यानुसार राज्यातील पूर्व प्राथमिक ते इयत्ता बारावीपर्यंत शिक्षण देणार्‍या शाळांची माहिती युडायस प्लस प्रणालीमध्ये टप्प्या-टप्प्याने भरणे गरजेचे आहे.

प्रथम टप्प्यामध्ये शाळांची प्रोफाइल व शिक्षकांची माहिती नोंदविण्यासाठी प्रणाली कार्यान्वित करण्यात आली होती. तरीदेखील राज्यातील 220 शाळांची प्रोफाइल माहिती भरणे बाकी आहे. तसेच 30 हजार 927 शिक्षकांची माहिती प्रणालीमध्ये अद्ययावत करणे बाकी आहे. सद्यस्थितीनुसार 30 हजार 662 शाळांनी शिक्षकांची माहिती परिपूर्ण भरली आहे. परंतु 78 हजार 731 शाळांमधील शिक्षकांची माहिती अंतिम केली नाही. दुसर्‍या टप्प्यामध्ये विद्यार्थ्यांची माहिती भरण्यासाठी 15 जानेवारीपासून प्रणाली सुरू आहे. सद्य:स्थितीनुसार राज्यातील 2 कोटी 20 लाख विद्यार्थ्यांपैकी 45 लाख विद्यार्थ्यांचीच माहिती नोंदवली आहे.

विद्यार्थ्यांची माहिती प्रणालीमध्ये नोंदविण्याकरिता अडचणी येत असतील किंवा माहिती भरण्याकरिता शाळांकडून मुदतवाढीची विनंती असेल, तर या कार्यालयास लेखी कळवावे. जेणेकरून मुदतवाढीसाठी राज्य कार्यालयाकडून विनंती करण्यात येईल. लवकरच युडायस प्लसचा आढावा घेण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने युडायस प्लसचे काम करणारे जिल्हा, तालुका, केंद्र, शाळास्तरावरील संबंधितांना वेळेत माहिती सादर करण्यासाठी सूचित करावे. जिल्ह्यातील सर्व शाळांची माहिती अंतिम भरून झाल्यानंतर अंतिम माहितीचे प्रमाणपत्र युडायस प्लस प्रणालीवर अपलोड करावे, असे देखील पगारे यांनी स्पष्ट केले.

Back to top button