पुणे : कसबे पुण्य - कडूस येथे श्री पांडुरंग राही-रखुमाईची पाऊल घडी पहाण्यासाठी हजारो भाविकांची गर्दी | पुढारी

पुणे : कसबे पुण्य - कडूस येथे श्री पांडुरंग राही-रखुमाईची पाऊल घडी पहाण्यासाठी हजारो भाविकांची गर्दी

कडूस : पुढारी वृत्तसेवा : श्री पांडुरंग राही-रखुमाईचा माघ शुद्ध पोर्णिमेला पहाटे पाऊल घडीचा कार्यक्रम झाला. पाऊलखुणा पहाण्यासाठी हजारो भाविकांनी गर्दी गर्दी केली होती. पुण्य-कडूसमध्ये माघ शुद्ध दशमी ते माघ शुद्ध पोर्णिमा असा सहा दिवस तुकोबांच्या विनंतीनुसारच प्रत्यक्ष श्री पांडुरंग- राही रखुमाई कडूस येथे विश्रांतीसाठी येथे येत असतात. याप्रसंगी पंढरपूरमधील मंदिरात पुजा, अर्चा, काकड आरती होत नाही. ती कडुसच्या मंदिरात होत असते. सोमवारी (दि. ६) पहाटे ६ वाजता गमनासाठी पाऊल खुणा, पाऊल घडीचे नारदीय किर्तन काकडा आरतीचे आयोजन करण्यात आले होते. श्री पांडुरंग राही-रखुमाईच्या चरणी हजारो भाविक नतमस्तक झाले. पांडुरंगच्या गमन वेळी भाविक भावुक झाले होते. हा अनुपम्य सोहळा याची देही याची डोळा पहाण्यासाठी परिसरात जागा मिळेल तेथे बसण्यासाठी भाविकांनी रात्रीपासूनच मोठ्या संख्येने गर्दी केली होती. पहाटे हवेत गारवा असला तरी मुखी हरिनाम व अंत:करणात भगवंताला अभिवादन करण्याची ओढ चेहऱ्यावर दिसत होती.

श्री पांडुरंग- राही रखुमाई माघ शु ॥ दशमी ते माघ पौर्णिमा वास्तव्यानंतर पौर्णिमेस पांडुरंग पंढरपुरला जाण्यास निघतात. याप्रसंगी मुख्य गाभाऱ्यापासुन मंदीराच्या प्रवेशद्वारापर्यत सुगंधी फुलांच्या पायघड्या व माऊलीचे पाऊलांचे चरण असलेले घडीचे शोभिवंत मखमली कापड अंथरण्यात आले होते. या पायघड्यावरून पांडुरंगाचे पंढरपुरला प्रस्थान होत असते. श्री पांडुरंगाच्या चरणाचे ठसे या ठिकाणी उमटतात अशी भाविकांची श्रद्धा आहे. पाऊल घडीचे किर्तन सुरू असताना श्री पांडुरंगाच्या सहा दिवसाच्या वास्तव्याच्या अनुभुती जागवत श्री पांडुरंग राही- रखुमाई गमनामुळे सद्‌गतीत होऊन भावनावश तसेच डोळ्यांच्या कडा पाणवल्या होत्या. पण मनाच्या दुसऱ्या कोपऱ्यात पांडुरंग पुन्हा पुढच्या वर्षी येणार असल्याचे सांगत भाविक एकमेकांना धीर देत होते. श्री पांडुरंग आपल्यात असणार आहे ही भावना सुखावत ठेवते आणि हाच सकारत्मक ऊर्जेचा ठेवा जपत पुन्हा पांडुरंगाच्या आगमानाची वर्षभर प्रतिक्षा करतो असतो.

यावेळी देवस्थानच्या वतीने मुख्य मंदिरात परंपरेनुसार दिंडीकरी, भोजनकरी, मानकरी यांना मानाचे फेटे नारळ प्रसाद देऊन सन्मानीत करण्यात आले.

अशी आहे आख्यायिका….

तुकाराम महाराज गंगाजीबुवा साधारणपणे माघ शुद्ध एकादशीला पंढरपूरात हजर रहात. एकदा काय झाले ते आणि त्यांचे शिष्य गंगाजीबुवा मवाळ पंढरपूरला जाण्यासाठी निघाले. त्याकाळी प्रवासाचे साधन म्हणजे स्वतःचे पाय आणि त्या पायाखाली खडबडीत काट्याकुट्यानी भरलेला रस्ता. गावोगावचे लोक त्यांच्याबरोबर सामिल होत. अचानक एका मुक्कामात गंगाजी बुवा आजारी पडले, तेव्हा तुकाराम त्याच्या सोबतीला राहिले. अन् बाकीच्याना पुढे जाण्यास सांगितले. त्याच्याबरोबर विठूरायाला निरोप पाठवला. दशमीची रात्र संपत आली तरी गंगाजीबुवांना बरे काही वाटेना. वर्षान् वर्षाचा नियम मोडणार म्हणून त्यांनी मनोमन पांडुरंगाला हाकारून उपाय सुचवायला सांगितले. भक्त आणि भगवतांच्या अद्वैत नात्याची कसोटी होती. एकादशीच्या पहाटेच तुकारारांना त्यांच्या विठूरायाचे दर्शन दिले आणि सांगितले की तुला आणि तुझ्या शिष्याला पंढरपूरपर्यत पायपीट करण्याची आवश्यकता नाही. मीच दरवर्षी तुमच्या भेटीला येथे येईल अन् पाच दिवस मुक्काम करीन. आश्चर्याची गोष्ट म्हणजे विठू माऊलीने दिलेले ते वचन निरंतर पाळले.

कडूस  येथील देवस्थानातील सांप्रादिक व जागृत विठ्ठलमुर्तीची प्रतिस्थापना स्वतः तुकाराम महाराजांनी केलेली असल्याने ऐतिहासिक पुरावे आहेत. प्रतिवर्षीप्रमाणे या सहा दिवसांत पाडुंरंग उत्सव मोठ्या भक्ती भावाने साजरा करण्यात आला.

संत तुकाराम महाराजांच्या चौदा टाळकऱ्यापैकी संतशिरोमणी गंगाजी बुवा मवाळ मुकुटमणी होते. गंगाजी बुवा मवाळ यांच्या वास्तव्याने आणि संत तुकाराम महाराजांच्या किर्तनाने कडूसगावत दैवी पावित्र्य लाभले आहे. गंगाजी बुवा मवाळ तुकाराम महाराजांच्या किर्तनाच्यावेळी मागे उभे राहून साथ करीत असत. कडूसकरांना तुकाराम महाराजांनी असे सांगितले की माघ शुद्ध दशमीला श्री पांडुरंगाने माझा अंगिकार केला व ज्ञान प्राप्ती झाली व माझी अभंग साधना सुरू झाली. या अंगीकाराची आठवण कायम राहावी म्हणून तुम्ही गावात पांडुरंग उत्सव साजरा करावा. गंगाजी बुवा मावळ माघ शुद्ध प्रतिपदा ते नवमी नवरात्र बसवतील, नंतर शुद्ध दशमी ते पौर्णिमा या काळात या प्रासादिक मूर्ती प्रांगनातल्या सिंहासनावर आधिष्ठित केल्या जात असतात. या सहा दिवसात पंढरीच्या विठोबारायाचे वास्तव्य कडूसगावी राहिल म्हणून तुम्ही उत्सव साजरा करा. तेव्हापासून गेली ३७७ वर्ष हा वरील दिवशी नित्यनेमाने साजरा केला जातो. ६ दिवस भोजन, प्रसाद वाटण्यात येतो. प्रत्येक दिवशीचा भोजन प्रसाद करण्यासाठी गावकऱ्यांमध्ये चढाओढ लागते. माघ शुद्ध पौर्णिमेला या उत्सवाची सांगता होत असते. भक्तिभावाने साजऱ्या करण्यात येणाऱ्या उत्सवात अनंत अडचणी, विघ्ने आली तरीही तो उत्सव दरवर्षी मोठ्या भक्तिभावाने साजरा होतो. असे म्हणतात की या सहा दिवसात पंढरपूरच्या विठ्ठलाचे वास्तव्य कडूस मुक्कामी असल्याने पंढरपूरला देवालयात पुजा, अर्चा, काकडा आरती होत नाही. ही काकडा आरती कडूस येथे केली जाते या उत्सवात अनेक विघ्ने आली तरी परमेश्वरी कृपेने ती दूर होतात, त्याबद्दल अनेक दंतकथा उपलब्ध आहे.

खुद्द तुकाराम महाराजांनी स्वतःजवळच्या प्रासादिक “पांडुरंग- राही- रखुमाई मुर्ती गंगाजी पंताना दिल्या व सदगुरु केशव चैतन्य यांच्या पादुकाही मुर्तीजवळ ठेवण्यासाठी देऊन त्याचे पुजन मनोमावे करण्याचा उपदेश केला. श्री गंगाजी माघ शुद्ध प्रतिपदा ते नवमी पर्यत नवरात्र करीत व दशमीला पारणे फेडीत. संत तुकाराम महाराज २८ वर्षे या उत्सवात सहभागी झाले होते. हातात टाळ घेऊन भजन, किर्तन करत होते.

कडूस येथील श्री पांडूरंग मंदिरात  संत तुकाराम महाराजांचे १४ वे टाळकरी गंगाजी बुवा मवाळांच्या हस्तलिखीत श्री संत शिरोमणी तुकाराम महाराजांच्या गाथेची अस्सल प्रत कडूस येथे असून ग्रंथ आजही येथे उपलब्ध आहे. या गाथेत संत तुकाराम महाराजांनी गायलेले अभंग रचना बोरुच्या सहाय्याने लिहण्यात आल्या असून इतिहासाची साक्ष देत आहे. तुकाराम महाराजांच्या गाथेमधील काही ओव्या, ज्या इतरत्र मिळू शकल्या नाहीत, त्या कडूसच्या गाथेत उपलब्ध झाल्या आहेत. ही मोठी धर्म देणगी कडूस गावाला लाभली आहे.

Back to top button