पुणे : कसबा पेठ, चिंचवडसाठी 780 केंद्रांवर होणार मतदान | पुढारी

पुणे : कसबा पेठ, चिंचवडसाठी 780 केंद्रांवर होणार मतदान

पुणे : पुढारी वृत्तसेवा : चिंचवड आणि कसबा पेठ विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीसाठी मंगळवारपर्यंत (दि. 7) नामनिर्देशपत्रे स्वीकारण्यात येणार आहेत. दरम्यान, या दोन्ही मतदारसंघांसाठी मतदान केंद्रांची संख्या निश्चित करण्यात आली आहे.
मतदारयादी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम 9 नोव्हेंबर 2022 पासून राबवण्यात आला. यानुसार 5 जानेवारी 2023 रोजी जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांची अंतिम मतदारयादी प्रसिद्ध करण्यात आली.

त्यानुसार चिंचवड विधानसभा मतदारसंघात 3 लाख 1 हजार 648 पुरुष, 2 लाख 64 हजार 732 स्त्री आणि 35 तृतीयपंथी याप्रमाणे एकूण 5 लाख 66 हजार 415 मतदारसंख्या आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत मतदारांच्या संख्येत 48 हजार 106 ची वाढ झाली आहे. कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात 1 लाख 36 हजार 873 पुरुष, 1 लाख 38 हजार 550 स्त्री आणि 5 तृतीयपंथी याप्रमाणे 2 लाख 75 हजार 428 याप्रमाणे मतदारसंख्या आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत मतदारसंख्येत 15 हजार 255 ची घट झाली आहे. अंतिम मतदारयादीतील मतदारसंख्येच्या आधारे कसबा पेठ विधानसभा मतदारसंघासाठी 270 मतदान केंद्रे, तर चिंचवड विधानसभा मतदारसंघासाठी 510 मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत, अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी आरती भोसले यांनी दिली.

Back to top button