पुणे : राजकीय सलोखा जपत इच्छुकांचा संवाद ; उमेदवारीबाबत मांडले गेले आडाखे | पुढारी

पुणे : राजकीय सलोखा जपत इच्छुकांचा संवाद ; उमेदवारीबाबत मांडले गेले आडाखे

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  राजकीय विचार वेगवेगळे असले, तरी निवडणुकीच्या राजकारणात आपापले वैचारिक मुद्दे मांडताना परस्परांमधील सौहार्दाचे वातावरण कायम ठेवण्याचे पुण्यातील वैशिष्ट्य बुधवारी पुन्हा एकदा दिसून आले. कसबा पेठ मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी रिंगणात उतरण्यास सज्ज झालेले विविध प्रमुख राजकीय पक्षांचे इच्छुक बुधवारी (दि. 1) एकत्र जमले.
निमित्त होते वाडेश्वर कट्टा. सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास सर्वच पक्षांचे अनेक इच्छुक या संवादाच्या कार्यक्रमाला जमले.

आपलाच पक्ष कसा विजयी होणार, याची हिरिरीने मांडणी करताना प्रतिपक्षाच्या इच्छुकांनाही ते शुभेच्छा देत होते. राजकीय टीकाटिप्पणी कसेच मिस्कील टिप्पणी करताना संभाव्य उमेदवारांचे अंदाजही बांधण्यात येत होते. उमेदवारी कोणाला मिळेल, याचे आडाखे प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने  मांडत होता.आमदार मुक्ता टिळक यांची राहिलेली उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी उमेदवारी पक्षाकडे मागितल्याचे त्यांचे पती शैलेश टिळक यांनी सांगितले. भाजपचे धीरज घाटे आणि हेमंत रासने हेही उपस्थित होते. भाजपच्या पारंपरिक मतदारसंघात बिनविरोध निवडणुकीसाठी भाजपने मागणी केली. पण, महाविकास आघाडीचे नेते गुडघ्याला बाशिंग बांधून निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत, अशी मिस्कील टिप्पणी घाटे यांनी केली.

त्यालाप्रत्युत्तर देताना राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे म्हणाले की, हा मतदारसंघ गिरीश बापट यांनी जोपासला. सर्वपक्षीयांशी त्यांच्या असलेल्या मैत्रीसंबंधांमुळे त्यांनी या मतदारसंघात विजय मिळविला होता. हा भाजपचा बालेकिल्ला म्हणता येणार नाही. काँग्रेसचे रवींद्र धंगेकर, बाळासाहेब दाभेकर, नीता रजपूत, कमल व्यवहारे, शिवसेनेचे शहराध्यक्ष संजय मोरे, विशाल धनवडे, राष्ट्रवादीचे रवींद्र माळवदकर, आम आदमी पक्षाचे विजय कुंभार या वेळी उपस्थित होते. सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी ’आप’ निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे कुंभार यांनी स्पष्ट केले.

धंगेकर म्हणाले की, महाविकास आघाडीचे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार ज्या पद्धतीने पायउतार व्हावे लागले, त्याचा बदला घेण्यासाठी ही निवडणूक होईल. भावनेवर ही निवडणूक होणार नाही, तर विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक होईल. शिवसेनेचा या निवडणुकीसाठी उमेदवार असावा, अशी मागणी पक्षाकडे केल्याचे धनवडे आणि मोरे यांनी सांगितले. महाविकास आघाडीचे नेते जो निर्णय घेतील तो मान्य असल्याचे त्यांनी सांगितले. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या इच्छुकांनीही त्याला दुजोरा दिला. अंकुश काकडे, डॉ. सतीश देसाई, श्रीकांत शिरोळे यांच्यासह अन्य काही राजकीय नेत्यांनी हा वाडेश्वर कट्टा आयोजित केला होता.

Back to top button