कडूस : श्री पांडुरंग-राही रखुमाईला पंचामृताने अभिषेक; हजारो भाविकांनी साजिरे रुप डोळ्यांत साठविले | पुढारी

कडूस : श्री पांडुरंग-राही रखुमाईला पंचामृताने अभिषेक; हजारो भाविकांनी साजिरे रुप डोळ्यांत साठविले

कडूस(ता. खेड); पुढारी वृत्तसेवा : 

सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती!

रखुमाईच्या पती सोयरिया !!

गोड तुझे रुप गोड तुझे नाम !

देई मज प्रेम सर्वकाळ!!

आकर्षक फुलांची सजावट..सनईचा मंजूळ स्वर…रंगिबेरंगी माळांचा झगमगाट…नयनमनोहरी रांगोळी अशा मंगलमय वातावरणात ब्रम्हवृदांनी केलेल्या मंत्रघोषात जया एकादशिनिमित्त श्री पांडुरंग- राही रखुमाईला पंचाअमृताने अभिषेक करण्यात आला. अभिषेकानंतर हजारो भाविकांनी श्री पांडुरंग-राही रखुमाईचे साजिरे रुप डोळ्यांत साठविले आणि विठ्ठल विठ्ठलच्या जयघोषाने अवघी प्रतिपंढरी कडूसनगरी भक्ती रसात न्हाऊन निघाली.

बुधवारी (दि. १) सकाळी सनई चौघड्यांचा मंजुळ स्वर आणि पुजारी ब्रम्हवंदांच्या वेदघोषात अभिषेक करण्यात आला. मुर्तींना पंचामृताने स्नान घालण्यात आले. वृद्राअभिषेक घालून तुळशीची माळ, मोगरा, झेंडूच्या फुलांचा हारमाळा, सोनेरी छत्रचामराने श्री पाडुंरंग आणि राही-रखुमाईचे रुप अधिकच खुलून आले. या नंतर दर्शन रांग सुरू झाली.

भाविकांनी शांततेत भाविकांनी दर्शन घेतले. मोठी गर्दी असुनही कोणतीही गडबड झाली नाही. दुपारी १ वाजेनंतर रात्रीपर्यत भाविकांच्या संख्येत मोठी वाढ झाली. मंदिरातील प्रवेशद्वारावरील फरशिवर काढलेली श्री पांडुरंग-राही रखुमाई, वारकरी यांच्या रांगोळीने भाविकांचे लक्ष वेधून घेतले. भाविकभक्तही मोठ्या भक्ती भावाने या रांगोळीला फुले वाहत होते.

एकादशीनिमित्त श्री पांडुरंग मंदिराच्या मंदिरात स्वरचौघड्याच्या मंजूळ स्वराने मंदिरातील वातावरण मंगलमय झाले होते. गाभाऱ्यामध्ये आकर्षक फुलांच्या सजावटीने गाभाऱ्याचे सौंदर्य लक्षवेधी होते. नेत्रदीपक रोषणाई भाविकांची मने जिंकून घेत होती. या वर्षी प्रथमच पाईट येथुन नवखंडेनाथ पाईट दिंडी सोहळा, वडगाव येथील दिंडीतील वारकऱ्यांनी गायलेल्या अभंगानी परिसर मंत्रमुग्ध केला.

Back to top button