पिंपरी : पिस्तूल बाळगणार्‍या तिघांना अटक | पुढारी

पिंपरी : पिस्तूल बाळगणार्‍या तिघांना अटक

पिंपरी : अवैध पिस्तूल बाळगणार्‍या तिघांना पोलिसांनी सापळा रचून अटक केली. चिंचवड आणि आळंदी पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली. रोहित ऊर्फ येशू दत्ता धावारे (19, रा. आनंदनगर झोपडपट्टी, चिंचवड), अजय शंकर राठोड (रा. पाषाण पुणे), विष्णू आनंदा नरवडे (22, रा. आळंदी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीधरनगर, चिंचवड येथे रेल्वे रुळावर एकजण पिस्तूल घेऊन आला असल्याची माहिती अंमली पदार्थविरोधी पथकाला मिळाली.

त्यानुसार, पोलिसांनी सापळा रचून रोहित धावारे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक गावठी बनावटीचे पिस्तूल आणि एक काडतूस जप्त केले. तसेच, चिंचवडगाव येथे चिंचवड पोलिसांनी सापळा रचून आरोपी अजय राठोड याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक गावठी बनावटीचे पिस्तूल आणि काडतूस जप्त केले. याबाबत चिंचवड पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

दुसर्‍या कारवाईत आळंदी येथील एका हॉस्पिटलजवळ एक तरुण पिस्तूल घेऊन थांबला असल्याची माहिती आळंदी पोलिसांना मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी सापळा रचून विष्णू नरवडे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून पिस्तूल आणि काडतूस जप्त केले आहे. याप्रकरणी आळंदी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Back to top button