पुणे : तो आला, त्याने गायले अन् जिंकले ! टू-बीएचके अल्फ्रेस्को आयोजित अरिजितसिंग लाइव्ह कॉन्सर्ट दणक्यात | पुढारी

पुणे : तो आला, त्याने गायले अन् जिंकले ! टू-बीएचके अल्फ्रेस्को आयोजित अरिजितसिंग लाइव्ह कॉन्सर्ट दणक्यात

पुणे; पुढारी वृत्तसेवा : द मिल्स राजाबहाद्दूर सिटी सेंटरचे मैदान… तेरा ते चौदा हजार तरुणाईच्या गर्दीत हायड्रोलिक स्टेजद्वारे अरिजितसिंग हा पिआनो वाजवत रंगमंचावर अवतरला अन् त्याला पाहून तरुणाईच्या काळजाचा ठोका चुकला. एकापेक्षा एक बहारदार गाणी सादर करीत अरिजितने तरुणाईला अक्षरश: नाचायला भाग पाडले. त्याच्या सुरात-सूर मिसळत तरुणाईने अरिजितचा लाइव्ह कॉन्सर्ट शुक्रवारी एन्जॉय केला. तब्बल तीन तास हा कॉन्सर्ट सुरू होता.

‘केसरीया तेरा इश्क है पिया’ यापासून ते ‘अच्छा चलता हूँ… दुआ में याद रखना’ अशी विविध गाणी सादर करीत त्याने तरुणाईला वेड लावले. चित्रपटातल्या गाण्यातून सुरांनी भेटणारा अरिजित प्रत्यक्ष समोर गात असल्याची अनुभूती तरुणाईसाठी खास ठरली. शहराच्या मध्यवस्तीत प्रथमच एवढा मोठा लाइव्ह कार्यक्रम पहिल्यांदाच पार पडला. पुणेकरांनी देखील या कार्यक्रमाला उदंड प्रतिसाद देत अरिजितला मंत्रमुग्ध होऊन ऐकले. या कार्यक्रमाचे आयोजन टू-बीएचके अल्फ—ेस्कोच्या वतीने करण्यात आले होते.

या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्त्या आणि प्रसिद्ध गायिका अमृता फडणवीस, विभागीय आयुक्त सौरभ राव, पोलिस आयुक्त रितेश कुमार, सह पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, कॉन्सर्टचे आयोजक वन-बीएचके आणि टू-बीएकेचे ब—ँड ओनर हेरंब शेळके, अंबर आयदे आदी मान्यवर उपस्थित होते.

कॉन्सर्टला पोलिसांचा चोख बंदोबस्त
विदेशात शहराचा आनंदी स्तर उंचाविण्यासाठी अशा कार्यक्रमांचे मोठ्या प्रमाणात आयोजन केले जाते. त्याच उद्देशातून पुण्यात देखील अरिजितच्या कॉन्सर्टचे आयोजन करण्यात आले होते. तब्बल तीन तास अरिजितने एकापेक्षा एक गाणी सादर केली. त्याच्या गाण्याला तरुणाईने देखील उभे राहून प्रचंड प्रतिसाद दिला. तो देखील तरुणाईमध्ये जाऊन हातात हात देत गात होता. कॉन्सर्टसाठी येणार्‍या प्रेक्षकांची संख्या लक्षात घेता पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

Back to top button