मंचर : ग्रामसभेबाबत आता आत्मपरीक्षणाची गरज! | पुढारी

मंचर : ग्रामसभेबाबत आता आत्मपरीक्षणाची गरज!

मंचर(ता. आंबेगाव); पुढारी वृत्तसेवा : अवसरी खुर्द येथे 26 जानेवारी रोजी आयोजित केलेली ग्रामसभा कोरमअभावी तहकूब करावी लागली. त्यामुळे सत्ताधारी तसेच विरोधी पक्ष आणि नागरिकांमध्ये ग्रामसभेबाबत उदासीनता आहे का ? ग्रामसभा आणि ग्रामसभेचे अधिकार, कर्तव्य याबाबत प्रशासनाने जनजागृती करणे गरजेचे आहे. ग्रामसभा कोरमअभावी तहकूब करावी का लागली, याचे आत्मपरीक्षण ग्रामपंचायतीने करणे गरजेचे आहे. ग्रामसभा ही आपापल्या कार्यक्षेत्रातील विविध विकासकामांच्या अडीअडचणी, त्यांचे निवारण करणे, त्यावर ठोस उपाययोजना करणे यासाठी आयोजित केल्या जातात.

त्याचबरोबर ग्रामपंचायत काय कामे करत आहेत, कोणती कामे सुरू आहेत याची माहिती ग्रामसभेच्या माध्यमातून नागरिकांना समजते. परंतु अवसरी खुर्द गावाची लोकसंख्या 10 ते 12 हजार असताना येथील ग्रामसभा रद्द करावी लागणे ही विचार करण्याची गोष्ट आहे. याबाबत सर्वच राजकीय पक्ष, ग्रामस्थ यांनी विचारविनिमय, चिंतन करणे गरजेचे असल्याचे दिसून येते. प्रशासनाने ग्रामसभा आणि अधिकार आणि कर्तव्य यावर प्रशासनाने जागृती करण्याची वेळ आली आहे.

ग्रामसभा ग्रामपंचायत कार्यालयात सुरू असताना काही आजी-माजी ग्रामपंचायत सदस्य, आजी-माजी सरपंच, उपसरपंच चौकात गप्पा मारत होते. खरंतर ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसभेच्या वेळी सुजाण नागरिकांनी उपस्थित राहणे हे सर्व ग्रामस्थांचे कर्तव्य होते. तसेच होऊ घातलेल्या विकासकामासंदर्भात चर्चा करणे, यातून चांगला मार्ग शोधणे हे होय. परंतु नागरिकांची असलेली उदासीनता विकासकामांवर परिणाम करणारी ठरू शकते. जेव्हा ग्रामसभा ग्रामपंचायत कार्यालयात सुरू होणार होती, त्या वेळी मंचरचे दोन पोलिस बंदोबस्तासाठी पोलिस गाडीत बसून होते. त्यामुळे नागरिक ग्रामसभेला कार्यालयात गेले नाही, अशी चर्चा दबक्या आवाजात सुरू होती.

गावातील इतर विविध संस्थांच्या पदाधिकार्‍यांना ग्रामसभेला हजर राहण्याचे आवाहन करण्यात आले होते. गावात कायदा आणि सुव्यवस्था राखणे हे पोलिसांचे काम होते. त्यामुळे पोलिस आले होते. ग्रामस्थांनी त्याचे कर्तव्य म्हणून या वेळी ग्रामपंचायत कार्यालयात उपस्थित राहून ग्रामसभेत सहभाग घ्यावयास हवा होता. पुढील ग्रामसभा सोमवारी (दि. 6 फेब्रुवारी) होणार आहे.
                                                 – कमलेश शिंदे, सरपंच, अवसरी खुर्द.

 

Back to top button