जारकरवाडी येथे दिवसाढवळ्या बिबट्याचे दर्शन | पुढारी

जारकरवाडी येथे दिवसाढवळ्या बिबट्याचे दर्शन

लोणी-धामणी; पुढारी वृत्तसेवा : आंबेगाव तालुक्यातील जारकरवाडी गावात बिबट्याची दहशत काही केल्या कमी होताना दिसत नाही. बुधवारी (दि. 25) सकाळी आठ वाजता जारकरवाडी गावच्या माजी सरपंच सरूबाई राजेंद्र लबडे, गोरक्ष शिवराम जारकड, हेमंत अशोक जारकड यांच्या शेतात स्थानिकांना बिबट्याचे दर्शन झाले. जनावरांसाठी चारास्वरूपात उपलब्ध असणार्‍या गवतात, मका पिकात बिबट्याचे ठसे आढळून आल्याची माहिती स्थानिकांनी दिली.

जारकरवाडीतील हा परिसर ऐन लोकवस्तीत आहे. जनावरांना चारा काढण्यासाठी शेतकरी शेतात जात असतात. यापूर्वी या परिसरात रात्री बिबट्या दिसून आला होता. मात्र, आज सकाळीच बिबट्याने दर्शन दिल्याने स्थानिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. बिबट्याला हुसकावून लावण्यासाठी लोकांनी फटाके वाजविले. या परिसरात बिबट्याला जेरबंद करण्यासाठी त्वरित पिंजरा लावावा, अशी मागणी जारकरवाडी ग्रामस्थांनी केली आहे.

Back to top button