स्टॉलधारकांच्या टेबल, खुर्च्या रस्त्यावर; खडकीतील राजीव गांधी चौपाटी परिसरातील चित्र | पुढारी

स्टॉलधारकांच्या टेबल, खुर्च्या रस्त्यावर; खडकीतील राजीव गांधी चौपाटी परिसरातील चित्र

खडकी; पुढारी वृत्तसेवा : कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या परिसरातील राजीव गांधी चौपाटी भागात खाद्यपदार्थांच्या स्टॉलच्या टेबल, खुर्च्या रस्त्यावर मांडण्यात येत आहेत. यामुळे रहदारीस अडथळा निर्माण होत असून, वाहनांच्या पार्किंगचाही प्रश्न निर्माण झाला आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. राजीव गांधी चौपाटीवर पार्किंगसाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र, या ठिकाणी अनेक स्टॉलधारक चायनीज खाद्यपदार्थ, वडापाव, कच्ची दाबेली, पोहे, चहा आणि आईस्क्रीमची दुकाने थाटत आहेत. ही दुकाने रात्री उशिरापर्यंत सुरू राहतात. या दुकानांच्या टेबल, खुर्च्या रस्त्यावर ठेवल्या जातात. मात्र, या स्टॉलला प्रशासनाची नियमावली लागू आहे की नाही, असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत.

रस्त्यावर ठेवण्यात येणार्‍या टेबल, खुर्च्यांमुळे या ठिकाणी येणार्‍या नागरिकांनी आपली वाहने कोठे पार्किंग करावे, असा प्रश्न निर्माण होत आहे. वाहनचालकांनी पार्किंगबाबत संबंधित स्टॉलधारकांकडे विचारणा केल्यावर त्यांना अरेरावीची भाषा केली जात आहे. यामुळे पार्किंगच्या जागेवर अतिक्रमण करणार्‍या स्टॉलधारकांवर बोर्ड प्रशासनाने कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
स्टॉलधारक चौपाटीवर अतिक्रमण करून मोठ्या प्रमाणावर जागा अडवत आहेत. मात्र, याकडे बोर्ड प्रशासन लक्ष देत नाही. यामुळे नागरिक आश्चर्य व्यक्त करीत आहेत. काही अधिकारी व कर्मचार्‍यांचे यामागे आर्थिक संबंध असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

स्टॉलधारकांकडून रस्त्यावर सायंकाळच्या टेबल, खुर्च्या लावण्यात येतात. यामुळे पार्किंगसाठी अडचण निर्माण होत असल्यास संबंधितांना सूचना देण्यात येईल. पार्किंगसाठी आडकाठी करणार्‍या व्यावसायिकांची माहिती महसूल विभागांकडे देऊन कारवाईची शिफारस केली जाईल.
                                -शिरीष पत्की, आरोग्य अधीक्षक, खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड

खडकी बाजारात खरेदीसाठी गेल्यावर वाहन पार्क करण्यासाठी चौपाटीवर जागा मिळत नाही. या ठिकाणी स्टॉलधारकांनी टेबल आणि खुर्च्या मांडल्याने पार्किंगसाठी जागा शिल्लक राहत नाही. स्टॉलधारकांना टेबल व खुर्च्या बाजूला घेण्याची विनंती केल्यावर ते अरेरावीची भाषा करीत आहेत.
                                                – मनोज वाल्मीकी, रहिवासी, खडकी

Back to top button