पिंपळे गुरव : मोरया पार्क परिसरातील रस्त्यावर गटार गंगा  | पुढारी

पिंपळे गुरव : मोरया पार्क परिसरातील रस्त्यावर गटार गंगा 

पिंपळे गुरव : येथील दाट लोकवस्ती असलेल्या मोरया पार्क भागात गेल्या दहा दिवसांपासून सहाव्या गल्लीत ड्रेनेज लाईन तुंबून गटारीचे मैलामिश्रित पाणी भागातल्या रस्त्यावर वाहत आहे. परिसरात मैला वाहत असल्यामुळे परिसरात दुर्गंधीचे वातावरण पसरले आहे. अश्या परिस्थितीत आरोग्याचा धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

मोरया पार्कमध्ये अरुंद गल्ल्या, तसेच दाट लोकवस्ती पाहायला मिळते.  अशा गल्ल्यांमध्ये लहान मुले, वयस्क, वृद्ध लोकाची वर्दळ असते. त्यामुळे अशा पसरलेल्या मैल्यामुळे परिसरात साथीचे आजार उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. मलनिस:रण विभागाकडून तुंबलेले गटार साफ केले जाते. परंतु दुसर्‍या दिवशी ‘पुन्हा जैसे थे’ परिस्थिती निर्माण होते. ड्रेनेज लाईन तुंबते. मलनिस:रण विभाग कर्मचार्‍यांकडून तुबलेले गटार साफ केलेला मैला पुन्हा ड्रेनेज लाईनवर टाकल्याचे येथील स्थानिकाचे म्हणणे आहे. मलनिस:रण विभागाने लवकरात लवकर नवीन ड्रेनेज लाईन मागणी स्थानिकातून केली जात आहे.

मोरया पार्क भागात नागरिकांकडून बांधकाम आणि इतर राडारोडा टाकला जातो. त्यामुळे ड्रेनेज लाईन तुंबण्याचे प्रकार घडतात. सफाई कर्मचारी भागात पाठवून साफसफाई करण्यात आली आहे.

– संदीप पाडवी, कनिष्ठ अभियंता मलनिःसारण विभाग 

मोरया पार्कमधील सहा नंबर गल्लीमध्ये चेंबरमधून मैला मिश्रित पाणी वाहिल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. येथील रहिवाशांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. नवीन ड्रेनेज लाईन टाकून देण्यात यावी.

– सुरेश सकट 

पाचव्या लेनला ड्रेनेज लाईन नवीन टाकली आहे. परंतु गेल्या काही दिवसांपासून मोरया पार्क सहाव्या लेनमध्ये वारंवार ड्रेनेज लाईन तुंबत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरते. संबंधित विभागाचे कर्मचारी साफ सफाई येथे करून जातात परंतु दुसर्‍या दिवशी ड्रेनेज लाईन तुबत असल्याने रहिवाश्यांना मात्र नाहक त्रासाला सामोरं जावं लागतं आहे.

– स्थानिक रहिवाशी

Back to top button