श्री क्षेत्र वीरला भाविकांची अलोट गर्दी | पुढारी

श्री क्षेत्र वीरला भाविकांची अलोट गर्दी

परिंचे(ता. पुरंदर); पुढारी वृत्तसेवा : श्री क्षेत्र वीर  येथे पौष अमावस्येनिमित्त शनिवारी (दि. 21) श्रीनाथ म्हस्कोबा मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी अलोट गर्दी केली होती. यात्रेपूर्वीची अमावस्या असल्याने भाविकांनी गर्दी केली होती. तसेच देवस्थान ट्रस्टमार्फत यात्रा पोस्टर, बॅनर व पत्रिका, देवस्थानची दिनदर्शिका वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला. मंदिर व्यवस्थापनामार्फत पार्किंगची व्यवस्था, मंदिराची रंगरंगोटी, परिसराची स्वच्छता प्राधान्याने चालू असल्याचे देवस्थानचे अध्यक्ष संतोष धुमाळ यांनी सांगितले.

कोरोनाचा प्रादुभार्व ओसरल्यानंतरची ही पहिलीच यात्रा असल्याने या वेळी गर्दीचे उच्चांक मोडीत निघण्याची शक्यता आहे. त्या दृष्टिकोनातून यात्रेचे नियोजन चालू आहे. श्री क्षेत्र वीर येथे यात्राकाळात काही भाविक परंपरेप्रमाणे बैलगाडा घेऊन येतात. परंतु, मंदिर आणि मंदिराच्या परिसरात बैलगाडा मालकांनी बैल आणू नये, असे आवाहन विश्वस्त सचिव अभिजित धुमाळ यांनी केले आहे.

दरम्यान, अमावस्येनिमीत्त पहाटे 4.30 वाजता पूजा होऊन मुख्य गाभारा बंद करण्यात आला. सकाळी 6 वाजता मुख्य गाभारा दर्शनासाठी खुला करण्यात आला. सकाळपासून देवस्थान ट्रस्ट व भाविकांतर्फे देवाला अभिषेक करण्यात आले. सकाळी 10 वाजता देवाला भाविकांच्या दहीभाताच्या पूजा बांधण्यात आल्या. देऊळवाड्यात दगडी कासवावर सालकरी गोसावी मंडळींचा पारंपरिक गोंधळाचा कार्यक्रम दिवसभर सुरू होता. दुपारी 12 वाजता देवाची धुपारती होऊन मुख्य गाभारा बंद करण्यात आला.

दुपारी 1.15 वाजता गाभारा पुन्हा दर्शनासाठी खुला करण्यात आला. समस्त पान व्यापारी व श्रीनाथ म्हस्कोबा प्रसन्न ग्रुप यांनी भाविकांना महाप्रसादचे आयोजन केले होते. देवस्थान ट्रस्टमार्फत भाविकांसाठी पिण्याचे पाणी, वीज, दर्शनबारी, सॅनिटायझर, वाहनतळाची सुविधा देण्यात आली होती. या वेळी ट्रस्टचे उपाध्यक्ष रवींद्र धुमाळ, विश्वस्त हनुमंत धुमाळ, अमोल धुमाळ, नामदेव जाधव, दत्तात्रय समगीर, संजय कापरे, राजेंद्र कुरपड आदी उपस्थित होते.

Back to top button