बारामती : ’कृषिक’ प्रदर्शनाची महादेव जानकर यांनाही भुरळ | पुढारी

बारामती : ’कृषिक’ प्रदर्शनाची महादेव जानकर यांनाही भुरळ

बारामती; पुढारी वृत्तसेवा : येथील अ‍ॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित अटल इन्क्युबेशन सेंटर व कृषी विज्ञान केंद्रातर्फे आयोजित ’कृषिक’ या कृषी प्रदर्शनाला राज्याचे माजी मंत्री व आमदार महादेव जानकर यांनी शुक्रवारी (दि. 20) भेट दिली. ’मी देशासह परदेशात अनेक कृषी प्रदर्शने पाहिली; परंतु बारामतीचे कृषी प्रदर्शन अद्वितीय आहे. येथील तंत्रज्ञान गावागावात पोहोचले पाहिजे. शेतकर्‍यांनी पत्नी-पोराबाळांसह हे प्रदर्शन बघण्याची गरज आहे,’ असे जानकर म्हणाले. जानकर यांच्यासह कर्नाटकाचे माजी ऊर्जामंत्री वीरकुमार पाटील यांनीही या प्रदर्शनाला भेट दिली. ट्रस्टचे चेअरमन राजेंद्र पवार त्यांच्यासोबत होते.

जानकर म्हणाले, ट्रस्टच्या वतीने उभारण्यात आलेला सायन्स पार्क पाहून मी फार प्रभावित झालो आहे. मी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांशी बोलून जिल्हा परिषदांच्या शाळांमधील मुलांना हे तंत्रज्ञान दाखवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. मी स्वतः उच्चशिक्षित आहे, तरीदेखील मला आजपर्यंत उपग्रहांची माहिती नव्हती. मात्र, या सायन्स पार्कच्या माध्यमातून मी थेट चंद्रावर जाऊन आलो. हे सारं अनुभवल्यानंतर असं वाटतं की, आपली मुले शास्त्रज्ञ व्हायची असतील तर अशा प्रकारच्या चांगल्या ठिकाणी त्यांना प्रशिक्षण मिळाले पाहिजे.’

’देशाला जगाच्या तोडीस तोड शास्त्रज्ञ हवे असतील तर या सारख्या संस्था वाढल्या पाहिजेत. त्या निर्माण झाल्या पाहिजेत अथवा अशा संस्थांचे सहकार्य इतर संस्थांना मिळाले पाहिजे. कृषी विज्ञान केंद्र ज्या पद्धतीने ’कृषिक’ प्रदर्शन आयोजित करते, ते पाहून मनाला खूप आनंद वाटला. अशा प्रकारचे जिवंत प्रात्यक्षिक पाहिल्यानंतर शेतकर्‍यांना इतर गोष्टी सांगण्याची गरज पडणार नाही,’ असे ते म्हणाले.

बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्राने कृषी विस्तारामध्ये जी भूमिका बजावली आहे, ती इतर कोणत्याही कार्यक्रमाच्या तुलनेत उजवी आहे आणि त्याचबरोबर शेतकर्‍यांना भावणारी आहे. पशुसंवर्धन, भाजीपाला, नवनवीन तंत्रज्ञान, नवनवीन पिकांच्या जाती यांचा थेट जिवंतपणा प्रात्यक्षिकामध्ये आणून त्यांनी शेतकर्‍यांना अतिशय योग्य दिशा दिली आहे. या सर्व टीमचे माझ्याकडून व माझ्या कृषी विद्यापीठाकडून अभिनंदन.

         डॉ. शरद गडाख, कुलगुरू, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ,अकोला.

 

Back to top button