पिंपरी : दिघी पोलिस ठाण्यात नातेवाईकांचा राडा | पुढारी

पिंपरी : दिघी पोलिस ठाण्यात नातेवाईकांचा राडा

पिंपरी : ब्रेन स्ट्रोकने मृत्यू झाल्यानंतर मृताच्या नातेवाइकांनी पोलिस ठाण्यात मृतदेह ठेवून राडा केला. मृताची पत्नी व पोलिसाने दमबाजी केल्यानेच मृत्यू ओढावल्याचा आरोप या वेळी करण्यात आला. हा प्रकार शनिवारी (दि. 14) सकाळी दिघी येथे घडला. ऋषभ मुकुंद जाधव (34, रा. दिघी) असे मृताचे नाव आहे. ऋषभ जाधव आणि त्यांच्या पत्नीचा सन 2019 पासून कौटुंबिक कारणावरून न्यायालयात वाद सुरू आहे. दरम्यान, न्यायालयाने ऋषभ यांनी त्यांच्या पत्नीला घरात राहण्यासाठी पैसे, दुसर्‍या घराची सोय अथवा त्यांना दुसरे घर भाड्याने घेऊन देणे असा खडकी न्यायालयाने अंशतः निकाल दिला होता. त्यानुसार, दिघी पोलिस ठाण्यातील पोलिस अंमलदार संदीप कांबळे यांनी ऋषभ यांना फोन करून पोलिस ठाण्यात बोलावून घेतले आणि निकालाबाबत सांगितले.

त्यानंतर ऋषभ यांची पत्नी आणि तिचे नातेवाईक ऋषभच्या घरी गेले. घर बंद असल्याने तिथे त्यांची बाचाबाची झाली. त्या ठिकाणीदेखील पोलिस अंमलदार संदीप कांबळे गेले. त्या वेळी एकाने त्यांचा व्हिडीओ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, अंमलदार कांबळे यांनी त्याचा मोबाईल काढून घेत पोलिस ठाण्यात येण्यास सांगितले. दरम्यान, ऋषभ यांना त्याची पत्नी, तिची आई, वडील, भाऊ आणि अन्य दोन महिलांनी घेराव केला. तसेच, धक्काबुक्की केल्याने ऋषभ खाली कोसळले. त्यांना रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. डॉक्टरांनी ऋषभ यांना ब्रेन स्ट्रोक आल्याचे सांगितले.

मृतदेह थेट ठाण्यात
नातेवाइकांनी शनिवारी सकाळी ऋषभ यांचा मृतदेह थेट पोलिस ठाण्यात आणला. संबंधित पोलिसांवर कारवाई करा, तोपर्यंत मृतदेह उचलणार नाही, असा पवित्रा नातेवाइकांनी घेतल्याने तणाव निर्माण झाला होता. घटनेची माहिती मिळताच उपायुक्त विवेक पाटील, सहायक आयुक्त प्रेरणा कट्टे यांनी घटनास्थळी धाव घेत प्रकरण शांत केले.

पत्नीसह नातेवाइकांवर गुन्हा
ऋषभ यांच्या मृत्यूप्रकरणी मिलिंद पाटील यांनी दिघी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, ऋषभ यांची पत्नी पूजा जाधव, तिची आई उज्ज्वला तापकीर, वडील दत्तात्रय तापकीर, भाऊ वेदांत तापकीर आणि दोन महिलांच्याविरोधात शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसाने धमकावल्याचा आरोप
दिघी पोलिस ठाण्यातील पोलिस अंमलदार संदीप कांबळे यांनी ऋषभ जाधव यांना धमकावले. त्यामुळे त्यांना धक्का बसून त्यात ऋषभ यांचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाइकांनी केला आहे. पोलिस अंमलदार कांबळे यांच्याविरोधात कारवाई करून त्यांना बडतर्फ करण्याची मागणी नातेवाइकांनी केल्याचे एकच खळबळ उडाली.

 

नातेवाइकांच्या भावना लक्षात घेत दोषींवर कारवाईचे आश्वासन देण्यात आले आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे. चौकशीअंती कर्मचारी दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.
                              – दिलीप शिंदे, वरिष्ठ निरीक्षक,  दिघी पोलिस ठाणे

Back to top button