पिंपरी : चिंचवडचे तारांगण सायन्स पार्क चालविणार ; पालिका 29 वर्षांच्या कराराने देणार | पुढारी

पिंपरी : चिंचवडचे तारांगण सायन्स पार्क चालविणार ; पालिका 29 वर्षांच्या कराराने देणार

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेचे ऑटो क्लस्टर, चिंचवड येथील आंतरराष्ट्रीय दर्जाचे तारांगण उद्घाटनाअभावी वर्षभरापासून धूळखात पडले आहे. हे तारांगण पालिकेच्या सायन्स पार्कला तब्बल 29 वर्षे चालविण्यासाठी देण्यात येणार आहे. पालिकेचे ऑटो क्लस्टरसमोर सायन्स पार्क आहे. ते पाहण्यासाठी शहरातील तसेच, राज्यभरातील विद्यार्थी येथे नियमितपणे येत असतात. सायन्स पार्कच्या शेजारी तारांगण उभारण्यात आले आहे. अनेक महिने रखडलेले हे काम वर्षभरापूर्वी पूर्ण झाले. मात्र, उद्घाटनाअभावी ते अद्याप सुरू करण्यात आलेले नाही.

तारांगणात शालेय विद्यार्थ्यांसाठी तारामंडळ, ग्रह, तारे यांची माहिती देण्यासाठी व्हिडिओ व ऑडिओ फिल्म दाखविण्यात येणार आहे. त्याचा कालावधी 30 मिनिटांचा आहे.  हा प्रकल्प विज्ञानाशी संबंधित असल्याने तो चालविण्यासाठी सायन्स पार्कला देण्यात यावा, असा प्रस्ताव विद्युत मुख्य कार्यालयाने आयुक्त शेखर सिंह यांच्यासमोर ठेवला होता. त्यासंदर्भात आयुक्तासोबत 2 डिसेंबर 2022 ला बैठकही झाली. सायन्स पार्क संचालक मंडळावर पालिका आयुक्त हे अध्यक्ष आहेत. तसेच, विविध क्षेत्रातील शास्त्रज्ञ हे संचालक आहेत. तारांगण प्रकल्प चालविणे, त्याची देखभाल व दुरुस्ती, तिकिटाचे दर ठरविणे, परिसरातील मिटींग हॉल, प्रदर्शन हॉल, कॅन्टीन आदी व इतर सुविधा पुरविण्याबाबत सायन्स पार्कसोबत 29 वर्षांचा करारनामा करण्यात  येणार आहे.

अधिकार्‍यांची समिती स्थापन

करारनाम्यातील अटी व शर्ती ठरविण्यासाठी अतिरिक्त आयुक्त (क्रमांक 1), मुख्य लेखा परीक्षक, कायदा सल्लागार, विद्युत विभागाचे सहशहर अभियंता, भूमि आणि जिंदगी विभागाचे सहायक आयुक्त यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यानंतर पालिका व सायन्स पार्क यांच्यात करार केला जाणार आहे. त्या समितीला तसेच, तारांगण सायन्स पार्कला देण्यास आयुक्त सिंह यांनी मान्यता दिली.

Back to top button