पुणे : नवीन वर्षात शहरात गोवरचे आठ रुग्ण | पुढारी

पुणे : नवीन वर्षात शहरात गोवरचे आठ रुग्ण

पुणे; पुढारी वृत्तसेवा : शहरात नवीन वर्षातही गोवरचे रुग्ण आढळून आले आहेत. राज्याच्या आरोग्य विभागाच्या अहवालानुसार, पुण्यात गणेश पेठ आणि ताडीवला रस्ता येथे एकूण 8 गोवरचे रुग्ण आढळून आले आहेत. संशयित रुग्णांची संख्या 26 इतकी आहे. मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात राज्यात गोवरच्या उद्रेकाला मुंबईतून सुरुवात झाली. त्यानंतर शहरात 3 डिसेंबर रोजी पुण्यात आठ रुग्णांचे गोवरचे अहवाल पॉझिटिव्ह आले. गोवरच्या पार्श्वभूमीवर तपासणी आणि लसीकरण सुरू करण्यात आले.

शहरात 22 डिसेंबर रोजी नवीन 15 रुग्णांना गोवर, तर दोन रुग्णांना रुबेलाचा संसर्ग असल्याचे समोर आले. नवीन 15 रुग्णांमुळे गोवरच्या रुग्णांची संख्या 26 वर गेली. यंदा प्रथमच शहरात रुबेलाचे रुग्ण आढळले. यंदा 2023 जानेवारी मध्ये 8 गोवरचे रुग्ण आढळले असले तरी त्यांचे नमुने डिसेंबर महिन्यातच तपासणीसाठी पाठवण्यात आल्याचे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

गोवर आणि रुबेला या दोन्ही आजारांमध्ये त्वचेवरील लाल रंगाचा पुरळ हे समान लक्षण असले तरी रुबेला हा वेगळ्या विषाणूमुळे होणारा आजार आहे. तो गोवरएवढा गंभीर नाही आणि त्याच्या संक्रमणाचा वेगही गोवरच्या तुलनेत कमी आहे. दाट लोकवस्तीचे ठरावीक भाग सोडल्यास त्या बाहेर गोवर अद्याप आढळत नाही, ही सकारात्मक गोष्ट असल्याचे बालरोगतज्ञांचे म्हणणे आहे.

ज्या परिसरात रुग्ण आहेत त्या परिसरात गोवरग्रस्त मुलांचा वयोगट सहा ते नऊ महिने एवढा असेल तर मुलांना शून्य लस दिली जात आहे. उद्रेक असलेल्या भागात नऊ महिने ते पाच वर्ष वयाच्या मुलांना अतिरिक्त मात्रा दिली जात आहे. लसीकरणाचा पहिला टप्पा 25 डिसेंबर रोजी पूर्ण झाला असून दुसरा टप्पा 15 जानेवारी रोजी सुरू होणार आहे.

Back to top button