नसरापूर : सातारा महामार्गावरील अतिक्रमणांवर पडणार हातोडा | पुढारी

नसरापूर : सातारा महामार्गावरील अतिक्रमणांवर पडणार हातोडा

नसरापूर (ता. भोर); पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने वेळीच लक्ष न दिल्याने पुणे-सातारा महामार्गावरील व्यावसायिकांनी अतिक्रमण केले आहे. यातील काही अतिक्रमणे पाडली असून, कापूरहोळ मुख्य चौकातील अतिक्रमणावर आठवडाभरात हातोडा पडणार आहे. यामुळे स्वतःहून अतिक्रमणे हटवून घेण्याचे आवाहन अधिकार्‍यांनी केले आहे. कापूरहोळ व भोर फाटा येथील अतिक्रमणे पाडणार आहे. या पार्श्वभूमीवर बारामती विभागाचे अप्पर पोलिस अधीक्षक आनंद भोईटे यांनी बुधवारी (दि. 11) भेट देऊन महामार्गावरील अतिक्रमण परिस्थितीची पाहणी केली.

यावेळी पोलिस निरीक्षक सचिन पाटील, वाहतूक शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे तोडकरी, लक्ष्मण पाटील, रिलायन्सचे अनुराग शर्मा, अमित भाटिया, राकेश कोळी, बी. जे. शर्मा, कापूरहोळचे उपसरपंच रवींद्र (बाबी) गाडे, पोलिस पाटील सय्यद शेख तसेच हॉटेल व्यावसायिक उपस्थित होते.

अप्पर पोलिस अधीक्षक आनंद भोईटे यांच्या उपस्थितीत कापूरहोळ चौक येथे बैठक घेऊन चौकातील येथील रस्ता रुंदीकरण करून वाहतूक कोंडी होणार नाही याबाबत चर्चा झाली. सेवा रस्त्यावर वाहने पार्क होणार नाहीत, याची दक्षता घेण्याची भोईटे यांनी सूचना पोलिसांना दिल्या. तसेच महामार्गावर हद्द निश्चित लावण्याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या अधिकार्‍यांना सूचना दिल्या. व्यावसायिकांनी स्वतःहून महामार्गावरील अतिक्रमण काढावे, असे आवाहन पोलिसांनी केले.

कायदेशीर प्रक्रियेनंतर महामार्गावरील अतिक्रमणे आठवडाभरात काढली जाणार आहेत. नुकसान टाळण्यासाठी व्यावसायिकांनी स्वतःहून महामार्गावरील अतिक्रमण काढावे.

                                                  – सचिन पाटील, पोलिस निरीक्षक, राजगड

Back to top button