राजगडावर उद्या 425 वा ऐतिहासिक राजमाता जिजाऊ जन्मोत्सव सोहळा | पुढारी

राजगडावर उद्या 425 वा ऐतिहासिक राजमाता जिजाऊ जन्मोत्सव सोहळा

वेल्हे : पुढारी वृत्तसेवा : स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ यांच्या 425 व्या ऐतिहासिक जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त गुरुवारी(दि. 12) राजगडाच्या मावळा तीर्थावर मानवंदना देण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. देशभरातील कर्तृत्ववान महिलांसह विविध क्षेत्रातील गुणवंतांचा, कष्टकर्‍यांचा गौरव करण्यात येणार आहे. राजगडाच्या पायथ्याशी पाल येथील मावळा तीर्थावर मावळा जवान संघटना व मावळा परिवाराच्या वतीने जन्मोत्सवाचे आयोजन केले आहे.

कर्नल सुरेश पाटील, भोरचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे, हवेलीचे उपविभागीय पोलिस अधिकारी भाऊसाहेब ढोले, ज्येष्ठ शिवभक्त राजेंद्र बांदल, तहसीलदार शिवाजीराव शिंदे , राष्ट्रसेवा समूहाचे अध्यक्ष राहुल पोकळे, शिवव्याख्याते दादासाहेब कोरेकरआदी उपस्थित राहणार आहेत. यंदाचा प्रतिष्ठेच्या राष्ट्रीय पातळीवरील राजमाता जिजाऊ गौरव पुरस्कार स्वाती पाचुंदकर, बारामती येथील लेखिका अर्चना सातव यांना देण्यात येणार आहे. कोल्हापूर येथील पूजा यमगर, शिवानी कोळी, साक्षी मोहिले, पुण्यातील प्रा. किर्ती शशिकांत जाधव, मधुबाला कोल्हे तसेच आंतरराष्ट्रीय जलतरणपटू संपन्न रमेश शेलार व राष्ट्रीय कुस्तीगीर धनराज भरत शिर्के, भोर येथील समीर घोडेकर, दिव्यांग उद्योजक अमोल चौधरी, प्रा. पांडुरंग पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील कर्तृत्ववानांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे, अशी माहिती संघटनेचे संस्थापक व इतिहास संशोधक दत्ताजी नलावडे यांनी दिली.

स्वराज्याच्या रक्षणासाठी मावळ्यांनी बलिदान देऊन जगातील पहिल्या लोकशाहीवादी, मानवतावादी स्वतंत्र राष्ट्राचा लढा अजरामर केला. जिजाऊ, शिवराय व वीर मावळ्यांचा वारसा जागविण्यासाठी मावळा जवान संघटनेच्या वतीने गेल्या 40 वर्षांपासून जिजाऊ जन्मोत्सव साजरा केला जात आहे. शाहिरी पोवाडे, शिवकालीन शस्त्रास्त्र खेळ, पालखी मिरवणूक आदी कार्यक्रमांनी जिजाऊंना मानवंदना दिली जाणार आहे.

जिजाऊंच्या न्यायदानाच्या पाऊलखुणा

12 जानेवारी 1598 रोजी सिंदखेडराजा येथे राजमाता जिजाऊंचा जन्म झाला. त्या वीर कन्या, वीर पत्नी व वीर माता आहेत. राजगडावर राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्या आयुष्याचा सर्वात अधिक काळ व्यतीत केला. हिंदवी स्वराज्याची पहिली राजधानी राजगडावर होती. येथून छत्रपती शिवरायांनी 25 वर्षे राज्यकारभार पाहिला. छत्रपती संभाजी महाराज यांनी येथे शिक्षण, राज्यकारभाराचे धडे घेतले. छत्रपती राजाराम महाराज यांचा जन्म येथे झाला. छत्रपती शिवाजी महाराज व राजमाता जिजाऊ यांनी गडाच्या पायथ्याशी असलेल्या मावळा तीर्थावर मावळ्या रयतेचे न्यायनिवाडे केले. स्वराज्यावर बलाढ्य शत्रूंची संकटे आली, अशा बिकट परिस्थितीत राजमाता जिजाऊंनी रयतेला धीर दिला. प्रसंगी हातात तलवार घेऊन शत्रू विरोधात लढण्यासाठी जिजाऊ सज्ज झाल्या, त्याच्या पाऊलखुणा येथे आहेत.

Back to top button