पुणे : ‘थर्टी फर्स्ट’ला तरुणाचा खून | पुढारी

पुणे : ‘थर्टी फर्स्ट’ला तरुणाचा खून

पुणे : नववर्षाच्या मध्यरात्री वारजे माळवाडी भागात पूर्ववैमनस्यातून एका तरुणाचा निर्घृण खून करण्यात आल्याची घटना घडली. वारजे पोलिसांनी याप्रकरणी चार संशयित आरोपींना बेड्या ठोकल्या. भूमिपुत्र युवराज कांबळे (रा. वारजे) असे खून झालेल्याचे नाव आहे. याबाबत कांबळे याचा भाऊ वीरफकिरा याने वारजे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

कांबळे याच्या खून प्रकरणात चार संशयितांना अटक करण्यात आली आहे. कांबळे आणि त्याचा मित्र मध्यरात्री वारजे भागातील विठ्ठलनगर परिसरातून निघाला होता. त्या वेळी आरोपी चिक्या ऊर्फ ओंकार जगताप आणि साथीदारांनी त्याला गाठले. त्याच्यावर कोयत्याने हल्ला चढविला. कांबळेच्या मित्राने पोलिसांना या घटनेची माहिती दिली. त्यानंतर वारजे पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. वरिष्ठ पोलिस निरीक्षक डी. एस. हाके तपास करीत आहेत.

Back to top button