पुणे : पाण्याची टाकी बांधण्याआधीच गेली चोरीला | पुढारी

पुणे : पाण्याची टाकी बांधण्याआधीच गेली चोरीला

पुणे/ मुंढवा; पुढारी वृत्तसेवा : बी. टी. कवडे रस्ता येथील श्री बालाजी बालक्रीडांगणाच्या पाठीमागील जागेमध्ये पालिकेकडून दोन मोठ्या पिण्याच्या पाण्याच्या टाक्या बांधण्याचे काम सुरू असताना टाक्या बांधण्यासाठी मागविण्यात आलेले तब्बल 5 टन स्टील चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे महापालिकेची टाकी बांधण्याआधीच ती चोरीला गेल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगली आहे. याविषयी लार्सन अँड टुब्रोचे कृष्णेंदू मायती यांनी 28 डिसेंबर रोजी मुंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पुण्यातील घोरपडी येथील बी. टी . कवडे स्पोर्ट्स अ‍ॅकॅडमीच्या शेजारी महापालिकेच्या पाण्याच्या टाक्या बांधण्याचे काम सुरू आहे.

ह्याच टाक्याचे बांधकाम करण्याचे काम महापालिकेनी लार्सन अँड टुब्रो कंपनीला दिले आहे. दोन टाक्या बांधण्याचे हे काम मागील दोन वर्षांपासून अपूर्णावस्थेत आहे. या टाक्या बांधण्यासाठी या परिसरात मोठ्या प्रमाणात स्टील ठेवले आहे. साईटवर नेमण्यात आलेला एकमेव सुरक्षारक्षक हा औषधोपचार करण्यासाठी दवाखान्यात गेला असताना त्याच्या अनुपस्थितीचा फायदा घेऊन चोरट्यांनी तब्बल 3 लाखांचे पाच टन म्हणजे पाच हजार किलो स्टील चोरी करून नेले. या प्रकरणी आता मुंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस ठाण्यात तक्रार का नाही
टाक्यांचे काम बंद असलेल्या या ठिकाणी स्टील, लोखंड पडलेले आहे. या टाक्यांच्या भोवती पत्र्याचे नादुरुस्त गेट आहे. या ठिकाणी पाठीमागील बाजूचे पत्र्याचे गेट तुटलेल्या अवस्थेत आहे. रात्रीच्या वेळी येथून स्टील, लोखंड गायब होत असल्याचे नागरिक सांगतात. येथील स्टील चोरी करण्यामध्ये काही स्थानिकांचा हात असल्याचीही चर्चा नागरिकांमध्ये आहे. येथील स्टील 22 डिसेंबरलाच गायब झाले होते, तर मग संबंधित कंपनीने लगेच पोलिस ठाण्यात तक्रार का केली नव्हती, असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत.

नागरिकांची चौकशीची मागणी
वास्तविक या ठिकाणी जादा स्टीलची चोरी झाली आहे. मात्र, संबंधित कंपनीने फक्त पाच टन चोरीचीच तक्रार दाखल केली आहे, अशी चर्चा नागरिकांमध्ये आहे.

या ठिकाणी पाच टन स्टील चोरीची फिर्याद आमच्याकडे आलेली आहे. आम्ही तपास करीत आहोत. आरोपींचा शोध घेणे सुरू आहे. सर्व तपास करून आम्ही पुढील कार्यवाही करणार आहोत.
                          – अजित लकडे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, मुंढवा पोलिस स्टेशन

 

Back to top button