पुणे : 57 तोळ्याचे दागिने चोरणारे दाम्पत्य जेरबंद | पुढारी

पुणे : 57 तोळ्याचे दागिने चोरणारे दाम्पत्य जेरबंद

पुणे; पुढारी वृत्तसेवा : कल्याणीनगर येथील एका बांधकाम व्यावसायिकाच्या घरात घरकामासाठी असलेल्या दाम्पत्यानेच रोकड आणि 57 तोळे सोन्या – चांदीचे दागिने चोरी करून पोबारा केला होता. बांधकाम व्यावसायिक त्यांच्या कुटुंबीयासह पर्यटनासाठी अलिबाग येथे गेल्यानंतर दोघांनी डल्ला मारून पोबारा केला होता. येरवडा पोलिसांनी अवघ्या चोवीस तासांच्या आत नागपूर येथून या दाम्पत्याला अटक केली आहे. त्यांच्याकडून अडीच लाखांची रोकड, 49 तोळे दागिने जप्त करण्यात आले आहेत. राजपाल वामन हारगे (39, रा. कल्याणीनगर, मूळ. रा. लातूर), उर्मिला हारगे (38) असे अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत कल्याणीनगर येथील एका बांधकाम व्यावसायिकाने फिर्याद दिली.

फिर्यादी हे बांधकाम व्यावसायिक असून, कल्याणीनगर येथे वास्तव्यास आहेत. मागील पाच ते सहा महिन्यांपासून त्यांच्याकडे हारगे दाम्पत्य कामासाठी होते. राजपाल हा ऑफिसमध्ये, तर त्याची पत्नी उर्मिला ही घरामध्ये काम करत होती. त्यांना राहण्यासाठी व्यावसायिकाच्या बंगल्याशेजारीच रूम उपलब्ध करून देण्यात आली होती. सोमवारी (दि. 26) बांधकाम व्यावसायिक आपल्या कुटुंबीयासह अलिबाग येथे फिरायला गेले होते.

या दरम्यान दोघांनी बंगल्याच्या तळमजल्यावरील बाथरूमच्या खिडकीचे ग्रील तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर घरातील 57 तोळे सोन्याचे दागिने, रोख रक्कम असा मुद्देमाल चोरून नेला. बांधकाम व्यावसायिक घरी परतल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. त्यांनी तात्काळ येरवडा पोलिसांत धाव घेत तक्रार दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून येरवडा पोलिसांनी आरोपीचा माग काढत नागपूर येथून त्यांना अटक केली. त्यांच्याकडून रोकड, सोन्या-चांदीचे दागिने असा 27 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

अप्पर पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा, पोलिस उपायुक्त शशिकांत बोराटे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाळकृष्ण कदम, पोलिस निरीक्षक उत्तम चक्रे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अंकुश डोंबाळे, स्वप्नाली गायकवाड, अमजद शेख, सागर जगदाळे, दत्ता शिंदे, सूरज ओंबासे, कैलास डुकरे यांच्यासह पथकाने ही कारवाई केली. पुढील तपास सहायक निरीक्षक रवींद्र आळेकर करत आहेत.

…म्हणून दाम्पत्याने गाठले नागपूर
राजपाल हारगे हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून, तो मूळचा लातूर येथील आहे. त्याच्यावर 2012 मध्ये खुनाचा गुन्हा दाखल आहे. तो कारागृहात असताना पळूनदेखील गेला होता. त्याच्यावर इतरदेखील गुन्हे दाखल आहेत. दोघांनी चोरी केल्यानंतर नागपूर येथे जाण्याचा बेत केला. तेथे गेल्यानंतर पोलिस आपल्याला पकडणार नाहीत. मात्र, तांत्रिक विश्लेषनाद्वारे तपास केला असताना दोघे नागपूर येथे पोहोचल्याची माहिती येरवडा पोलिसांना कळाली. त्यानुसार दोघांना अटक केली.

Back to top button