हॉस्पिटलच्या कर्जासाठी दबाव; ठराविक ठेकेदार डोळ्यासमोर ठेवून निविदा काढण्याचा घाट | पुढारी

हॉस्पिटलच्या कर्जासाठी दबाव; ठराविक ठेकेदार डोळ्यासमोर ठेवून निविदा काढण्याचा घाट

पुणे; पुढारी वृत्तसेवा : वारजे येथील 350 बेडचे मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलसाठी कोणतीही निविदा प्रक्रिया न राबवता सल्लागाराची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानंतर आता ठेकेदारासाठी कर्ज काढण्यासाठी एका राजकीय पक्षाचे पाच माजी नगरसेवक प्रशासनावर दबाव टाकत असल्याचे सूत्रांनी सांगितले. वारजे येथे 350 बेडचे डिजाईन-बील्ट – फायनान्स – फायनान्स – ऑपरेट – ट्रान्सफर (डीबीएफओटी) या तत्त्वावर मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्यात येणार आहे. हॉस्पिटलच्या निविदा प्रक्रियेला दोन वेळा मुदतवाढ देण्यात आल्यानंतर गुरुवारीअखेरच्या दिवशी दोन निविदा आल्या आहेत.

यामध्ये अहमदनगर येथील एक आणि दोनच वर्षांपूर्वी भागीदारीमध्ये स्थापन करण्यात आलेल्या पुण्यातील एका कंपनीचा समावेश आहे. यामधील एक कंपनी रस्ते, उड्डाणपूल आदींची कामे करते, तर दुसरी कंपनी विविध क्षेत्रात काम करते. दोन्ही निविदांची तांत्रिक तपासणी करून पुढील निर्णय घेण्यात येणार आहे.

दरम्यान, डीबीएओटी पद्धतीने हॉस्पिटल उभारणीची निविदा मागविण्यापूर्वी महापालिकेने एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट मागविले होते. यामध्ये दिल्ली आणि हैद्राबाद येथील आरोग्य क्षेत्रातील मोठ्या कंपन्यांनी प्रि बीड मिटींगला हजेरी लावली होती. मात्र, प्रत्यक्ष निविदा प्रक्रियेत या कंपन्या सहभागी झालेल्या नाहीत.

हॉस्पिटल उभारणीसाठी ठेकेदाराला महापालिकेने कर्ज काढून द्यायचे. त्याची परतफेड करण्याची संपूर्ण जबाबदारी ही ठेकेदारावर राहील, अशा उपसूचनेसह हा प्रस्ताव विनाचर्चाच मंजूर झाला. यासाठी पीडब्ल्यूसी या हरियाणातील सल्लागार कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे. जूनमध्ये या कंपनीला वर्कऑर्डर देण्यात आली. त्यानंतर आता ठेकेदारासाठी कर्ज काढण्यासाठी एका राजकीय पक्षाचे पाच माजी नगरसेवक प्रशासनाला तगादा लावत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

‘प्रशासनराज’ नावालाच!
शहरात जानेवारी व जून महिन्यात ’जी 20’ परिषदेमुळे रस्ते सुस्थितीत ठेवणे आवश्यक आहे. त्यासाठी महापालिकेने सर्व रस्ते डांबरीकरण करण्यासाठी 500 कोटी रुपयांच्या खर्चाचा अंदाज काढला आहे. महापालिकेत प्रशासकराज असल्याने सर्व निर्णय प्रशासन घेत आहे. पण, रस्त्याच्या डांबरीकरणाच्या निविदेत मर्जीतील ठेकेदाराला मिळवून देण्यासाठी दोन माजी पदाधिकारी प्रशासनावर दबाव टाकत असल्याचे बोलले जात आहे.

वारजे येथे मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्याबाबत पीडब्ल्यूसी या सल्लागार कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे. ही सल्लागार कंपनी शासनाच्या पॅनेलवरील आहे, त्यामुळे थेट वर्क ऑर्डर देण्यात आली आहे.
                                                                              -रवींद्र बिनवडे,
                                                                अतिरिक्त महापालिका आयुक्त.

Back to top button