ओतूर : बिबट्यांपासून सावधानता बाळगण्यासाठी विशेष मोहीम | पुढारी

ओतूर : बिबट्यांपासून सावधानता बाळगण्यासाठी विशेष मोहीम

ओतूर(ता. जुन्नर ); पुढारी वृत्तसेवा : जुन्नर तालुक्यातील बहुतांश भाग हा बिबट्याप्रवण क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे. जुन्नर तालुक्यात बिबट्यांच्या अधिवासासाठी पोषक वातावरण असल्याने व उसाचे शेतीक्षेत्र अधिकचे असल्यामुळे अलीकडच्या काळात बिबट्यांची संख्या वाढली आहे. तसेच, गेल्या काही दिवसांत बिबट्यांकडून पशुधन व मानवी हल्ल्याच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. त्यामुळे ओतूर वन विभागाने गावागावांत, वाडी-वस्त्यांवर स्पीकरद्वारे सावधानता बाळगण्याचे आवाहन करून जनजागृती मोहीम राबविल्याची माहिती ओतूर वन विभागाचे वन परिक्षेत्र अधिकारी वैभव काकडे यांनी दिली.

ओतूर, खामुंडी, डुंबरवाडी, पानसरेवाडी, डिंगोरे, उदापूर, शेटेवाडी, अहीनवेवाडी वगैरे आदी परिसरांतील वस्त्यांवर वन कर्मचारी प्रत्यक्ष जाऊन बिबट्याबाबत जनजागृती मोहीम राबवत आहेत. बिबट्यापासून संरक्षण कसे करावे? यासाठी नागरिकांना मार्गदर्शनपर योग्य माहिती देऊन बिबट्यांबाबतची मनातील भीती आणि संभाव्य हल्ले रोखण्यासाठी ओतूर वन विभागाचे वन परिक्षेत्र अधिकारी वैभव काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल सुधाकर गिते, परशुराम खोकले, साहेबराव पारधी हे रात्रीच्या वेळात गस्त घालून नागरिकांना सावधानता बाळगण्याविषयी विशेष प्रयत्न करीत आहेत.

नागरिकांनी कामानिमित्त शेतावर ये-जा करताना तसेच शालेय विद्यार्थ्यांनी ये-जा करताना समूहाने यावे-जावे, शेतकरीवर्गाने विशेष काळजी घ्यावी, शेतात वाकून काम करताना पाठीमागून बिबट्या हल्ला करीत असल्याने विशेष काळजी घ्यावी, पशुधन व मानवी हल्ला झाल्यास त्याची माहिती तात्काळ वन विभागाला कळवावी.

रात्रीच्या वेळात लहान मुलांना घराच्या अंगणात एकट्याने सोडू नये, घराच्या परिसरातील विजेचे दिवे सुरू ठेवावेत, घराच्या अंगणात शेकोटी पेटती ठेवावी, पशुधनावर हल्ला होऊ नये म्हणून गोठा पूर्णपणे बंदिस्त असावा, गुरे चरायला नेताना गुराख्यांनी जमावाने जावे, घुंगराची काठी जवळ बाळगावी, बिबट्यासमोर आल्यास आरडाओरड करावी, बिबट्याचा पाठलाग करू नये. कारण तो उलट हल्ला करू शकतो, बिबट्यांबाबत चुकीच्या अफवा पसरवू नयेत, या प्रकारचे आवाहन वन विभागाकडून करण्यात येत आहे.

Back to top button