पुणे : कुरकुंभ येथील फाॅरच्युन इंडस्ट्रीज कंपनीची फसवणूक | पुढारी

पुणे : कुरकुंभ येथील फाॅरच्युन इंडस्ट्रीज कंपनीची फसवणूक

कुरकुंभ : पुढारी वृत्तसेवा :  कुरकुंभ (ता. दौंड) औद्योगिक क्षेत्रातील फाॅरच्युन इंडस्ट्रीज कंपनीला कच्चा माल पाठवतो म्हणून ४ लाख ३८ हजार ९६० रूपयांना गंडा घातल्याचे उघड झाले आहे. हा व्यवहार ऑनलाईन पध्दतीने झाला आहे. याप्रकरणी एकावर दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आकाश माधवराव वाकोडे असे गुन्हा दाखल असलेल्याचे नाव आहे. कंपनीचे मॅनेजिंग  डायरेक्टर ओंकार चंद्रमोहन सावंत (वय २७ रा सावंत बंगला, गोपाळीवाडी रोड, दौंड) यांनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार २२ डिसेंबर २०२२ मध्ये घडला. याबाबत अधिक माहितीनुसार कुरकुंभ औद्योगिक क्षेत्रात फाॅरच्युन इंडस्ट्रीज कंपनी असून येथे पी. व्ही. सी. पाईप तयार होतात. त्यासाठी कंपनीला पीव्हीसी रेझीन हा कच्चा माल मोठ्या प्रमाणात लागतो.

गुरूवारी (दि. २२) फाॅरच्युन इंडस्ट्रीज कंपनी मेलवर मरूधर इंटरनॅशनल फर्मवरून आकाश माधवराव वाकोडे यांनी मेलवरून कोटेशन पाठवून पी. व्ही. सी रेझीन हा कच्चा माल ९३ रूपये प्रति किलो प्रमाणे ४ हजार किलो देण्याचे ठरवले होते. त्यानुसार फाॅरच्युन इंडस्ट्रीज कंपनीच्या (आयसीआयसीआय दौंड शाखा) खात्यावरून मरूधर इंटरनॅशनल फर्म याच्या एचडीएफसी बॅक (एसपी रिंग रोड अहमदाबाद) खात्यावर ४ लाख ३८ हजार ९६० रूपये आरटीजीएसच्या माध्यमातून कंपनीच्या खात्यावरून ऑनलाईन पध्दतीने पाठवले. त्यांना पैसै पोहच झाल्यानंतर त्यांनी फिर्यादीला फोन करून गायत्री वेअर हाऊस पारसनाथ कॉम्प्लेक्स दापोडी भिवंडी जि. ठाणे येथे गाडी पाठवून देण्यास सांगितले.

त्यानुसार ट्रान्सपोर्टची गाडी पाठवली आणि आकाश वाकोडे याला तसे फोन करून सांगितले असता आकाश वाकोडे याने दहा मिनिटात सांगतो म्हणून फोन कट केला. नंतर बऱ्याचदा प्रयत्न केला. मात्र, फोन बंद लागत होता. पैसे पोहच झाले; मात्र, त्याबदल्यात ठरलेला कच्चा माल फाॅरच्युन इंडस्ट्रीज कंपनीला पाठवला नसल्याने आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात आले. या घटनेचा तपास सहायक पोलीस निरीक्षक तुकाराम राठोड करीत आहे.

Back to top button