मोशी : नव्या वर्षात नवीन शाळेत भरणार वर्ग ; महापालिकेची पहिली अद्ययावत शाळा | पुढारी

मोशी : नव्या वर्षात नवीन शाळेत भरणार वर्ग ; महापालिकेची पहिली अद्ययावत शाळा

श्रीकांत बोरावके : 

मोशी : गेल्या अनेक वर्षांपासून जुन्या धोकादायक शाळेत शिक्षण घेणार्‍या चिमुकल्यांना 2023 या येत्या नव्या वर्षात दिलासा मिळाला आहे. सध्या तात्पुरत्या पत्राशेडमध्ये शिक्षण घेणार्‍या चिमुकल्यांचे नव्या वर्षात शाळेच्या नव्या इमारतीत वर्ग भरणार आहेत.
बोर्‍हाडेवाडी येथील कै. महादू श्रीपती सस्ते मुले-मुलींची शाळा क्रमांक तेरा या पालिका शाळेचे काम पूर्ण झाले आहे. यामुळे जानेवारीच्या पहिल्या किंवा दुसर्‍या आठवड्यातच इमारतीचे उद्घाटन होऊन इमारतीत शाळा भरणार आहे. या शाळेचा विषय मार्गी लागावा, याकरिता आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक नगरसेविका सारिका बोर्‍हाडे यांनी शाळेच्या जागेसह निर्माण झालेल्या अनेक समस्या सोडवत शाळेच्या बांधकामाचा प्रश्न मार्गी लावला आहे.

यात प्रशस्त वर्ग खोल्या, मुख्याध्यापक, शिक्षक कक्ष, प्रत्येक मजल्यावर स्वच्छतागृह, सभागृह, प्रयोगशाळा, वाचनालय, भांडारगृह, प्रशस्त पार्किंग व खेळण्यासाठी मैदान उपलब्ध असणार आहे. बोर्‍हाडेवाडीतील शाळेत वाडी व वस्त्यांवरील, संजय गांधी नगरमधील गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबातील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. इथे फक्त पहिली ते आठवीपर्यंतच वर्ग असल्याने नागरिकांना आपल्या मुलांच्या पुढील शिक्षणासाठी खासगी शाळेत टाकावे लागत होते.

खासगी शाळा व त्याच्या अवाजवी खर्च हा या कुटूंबाना न पेलवणारा होता. यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून येथील पालिकेच्या शाळेत पहिली ते दहावीपर्यंतचे शिक्षण दिले जाण्याची मागणीदेखील पूर्ण झाली आहे. पहिली ते दहावीपर्यंतचे शिक्षण एकाच छताखाली होणार असल्याने नागरिकदेखील काळजीमुक्त झाले आहे. शिवाय खासगी शाळेत टाकून खिशाला लागणारी कात्रीदेखील थांबणार आहे. पालिकेच्या शाळेची यामुळे गुणवत्ता व पटसंख्या वाढदेखील होणार आहे. एकंदरीतच बोर्‍हाडेवाडीतील शाळा आगामी काळात नव्या इमारतीत आणि नवीन वाढीव वर्गासह सुरू होत असल्याने पालिका शाळेत विद्यार्थ्यांची होणारी गळती थांबण्यास मदत होणार आहे.

शाळेची वैशिष्ट्ये

संपूर्ण इमारतीत अद्ययावत लिफ्ट सुविधा
इमारतीत अग्निरोधक यंत्रणा, आत्मकालीन फ्लोर
प्रत्येक मजल्यावर मुला-मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह
प्रत्येक वर्गखोलीत वातानुकूलित बांधकाम
प्रशस्त वर्गखोली, प्रशस्त सभागृह
इमारतीत अपंग विद्यार्थ्यांसाठी विशेष सुविधा

एकाच छताखाली दहावीपर्यंतचे शिक्षण
माजी नगरसेविका सारिका बोर्‍हाडे यांनी सांगितले की, आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशस्त शाळा उभारणीचे स्वप्न पूर्ण होणार असून, एकाच छताखाली दहावीपर्यंतचे शिक्षण उपलब्ध होणार आहे. स्वतः उच्चशिक्षित असल्याने प्राधान्याने शाळेबाबत येणार्‍या अनेक अडचणी सोडवून काम मार्गी लावल्याचे समाधान आहे.

Back to top button