पुणे : प्रमाणपत्र तारखेच्या अटीमुळे राज्यसेवेत काही उमेदवार अपात्र | पुढारी

पुणे : प्रमाणपत्र तारखेच्या अटीमुळे राज्यसेवेत काही उमेदवार अपात्र

पुणे; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्रासाठी घातलेल्या तारखेच्या अटीमुळे राज्यसेवा 2021 परीक्षेच्या मुलाखतीमध्ये काही उमेदवारांना अपात्र ठरविण्यात आले आहे. याबाबत उमेदवारांमध्ये नाराजी असून, राज्यसेवेच्या जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या नियमानुसार कार्यवाही केल्याचे स्पष्टीकरण एमपीएससीकडून देण्यात आले.

एमपीएससीतर्फे राज्यसेवा मुख्य परीक्षा 2021 च्या मुलाखतींची प्रक्रिया सुरू आहे. राज्यसेवा 2021 चे अर्ज भरण्यासाठी अंतिम मुदत 2 नोव्हेंबर 2021 होती. त्यामुळे उमेदवारांनी त्यापूर्वीचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक होते. मात्र, मुलाखतीवेळी काही उमेदवारांकडून 2 नोव्हेंबर 2021 नंतरचे नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र सादर करण्यात आले.

त्यामुळे एमपीएससीकडून दिलेल्या मुदतीनंतरची प्रमाणपत्रे सादर केलेल्या उमेदवारांची प्रमाणपत्रे अवैध ठरली. परिणामी, संबंधित उमेदवारांना अपात्र ठरविण्यात आले. दरम्यान, राज्यसेवेच्या जाहिरातीमध्ये सर्व नियम आणि अटी स्पष्टपणे नमूद केलेल्या होत्या. त्यानुसारच कार्यवाही करण्यात आल्याचे स्पष्टीकरण एमपीएससीच्या अधिकार्‍यांनी दिले.

पोलिस भरतीसाठी नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्राच्या तारखेची अट शासनाने शिथिल केली आहे. 2021 च्या राज्यसेवेच्या जाहिरातीवेळी कोरोनाकाळ असल्याने अनेक उमेदवारांना मुदतीत प्रमाणपत्रे उपलब्ध होऊ शकली नाहीत, याचा विचार करून उमेदवारांचे नुकसान होऊ नये, यादृष्टीने एमपीएससीनेही हा नियम शिथिल करण्याची मागणी स्पर्धा परीक्षार्थींनी केली.

Back to top button