पुणे : काम सुरू न झालेल्या निविदा रद्द करा : विक्रम कुमार | पुढारी

पुणे : काम सुरू न झालेल्या निविदा रद्द करा : विक्रम कुमार

पुणे; पुढारी वृत्तसेवा : निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सर्व प्रकारच्या मंजुरी दिल्यानंतरही कामे सुरू न झालेल्या निविदा रद्द करा, अशा सूचना महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी विभागप्रमुखांना दिल्या आहेत. चालू आर्थिक वर्षातील नऊ महिने संपत आले आहेत. त्यामुळे आगामी आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकाची तयारी प्रशासनाकडून सुरू आहे. या पार्श्वभूमीवर खर्ची पडू न शकणार्‍या कामांच्या तरतुदींचे वर्गीकरण करण्यावर भर दिला जाऊ लागला आहे.

याचाच एक भाग म्हणून महापालिका आयुक्तांनी नुकताच महापालिकेच्या वतीने शहरात केल्या जाणार्‍या, निविदा प्रक्रिया पूर्ण झालेल्या, स्थायी समिती आणि वित्तीय समितीने मंजुरी दिलेल्या सहा महिन्यांतील कामांचा आढावा घेतला. सर्व प्रक्रिया झाल्यानंतरही कामे सुरू न झालेल्या निविदा रद्द करण्याचा आदेश आयुक्त विक्रम कुमार यांनी दिला. तसेच हा निधी गरज असलेल्या ठिकाणी खर्च करण्याचाही आदेश दिला.

प्रस्तावांवर कार्यवाहीसाठी विलंब
भवन विभागाकडील प्रस्तावांमध्ये बांधकाम आराखड्यांचा विषय हा महत्त्वाचा आहे. या आराखड्यांमधील तांत्रिक बाबींत चुका आढळून आल्या. त्या दुरूस्त करणे किंवा आराखडा योग्य नसल्याने भवन विभागाच्या प्रस्तावांवर कार्यवाही करण्यास विलंब होत आहे.

ही कामे रद्द….
पथ विभागाकडील सुमारे 142 कामे ही आयुक्तांच्या आदेशामुळे रद्द करावी लागत आहेत. यामध्ये छोट्या रस्त्यांचा समावेश अधिक आहे. सरासरी वीस ते तीस लाख रुपयांची ही कामे आहेत. तर काही कामे ही जास्त रकमेची असून, या कामांसाठी पुरेशी तरतूद अंदाजपत्रकात केली नाही, अशीच कामे सुरू न झालेल्या निविदांमध्ये आहेत.

Back to top button