पुणे : 40 लाखांच्या कर्जाचा मोह पडला 27 लाखांना | पुढारी

पुणे : 40 लाखांच्या कर्जाचा मोह पडला 27 लाखांना

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  40 लाख रुपयांचे कर्ज मंजूर करून देण्याच्या बहाण्याने सायबर चोरट्याने आयटी क्षेत्रात नोकरी करणार्‍या तरुणाला 27 लाख 45 हजार रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार घडला. याबाबत एका 36 वर्षांच्या तरुणाने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांंनी माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार मार्च 2020 ते 5 मे 2022 दरम्यान ऑनलाईन घडला.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे एका आयटी कंपनीमध्ये नोकरी करतात. मार्च 2020 मध्ये त्यांचे वडील आजारी असल्याने, तसेच इतर कौटुंबिक अडचणींमुळे पैशाची गरज होती.

त्यांना कमी व्याजदरात 40 लाखांचे कर्ज देण्याचे प्रलोभन एका फायनान्स कंपनीतून बोलणार्‍याने दिले. त्यानुसार त्यांच्याकडून कागदपत्रे घेतली. कर्जासाठी त्यांना प्रथम दीड लाख रुपये ऑनलाईन पाठविण्यास सांगितले. वेगवेगळी कारणे सांगून त्यांच्याकडून पैसे मागविले जात होते. त्यानंतर त्यांनी लोन नंबर देऊन बँकेचा कॅन्सल चेक घेऊन विश्वास संपादन केला. नॉमिनी, कर्जाचे डिसबेसमेंट चार्ज, जीएसटी अशी वेगवेगळी कारणे सांगून सायबर चोरटे त्यांच्याकडून पैसे काढत राहिले. विमा पॉलिसी घेण्यासाठी आणखी पैशांची मागणी केली. कर्जाची रक्कम मोठी असल्याने डीडीमार्फत कर्ज रक्कम पाठवितो, असे सांगून डीडी चार्ज म्हणून त्यांच्याकडून आणखी पैशांची मागणी केली.

शेवटी तर आरबीआयमध्ये तुमची रक्कम अडकली आहे. त्यामुळे डिपॉझिट रक्कम म्हणून आणखी पावणेदोन लाख रुपये भरायला सांगितले. अशा प्रकारे 40 लाख रुपयांच्या कर्जासाठी तब्बल 27 लाख 45 हजार 655 रुपये भरायला सांगून सायबर चोरट्याने तरुणाला चांगलाच गंडा घातला. विश्रामबाग पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Back to top button