पुणे : परराज्यातून मोठी आवक मटारची स्वस्ताई! | पुढारी

पुणे : परराज्यातून मोठी आवक मटारची स्वस्ताई!

पुणे : देशातील पंजाब व मध्यप्रदेशातील मटारचा हंगाम बहरल्याने बाजारात मोठ्या प्रमाणात मटार दाखल होऊ लागला आहे. रविवारी मार्केट यार्डातील तरकारी विभागात 30 ट्रक मटार दाखल झाला. त्याला मागणीही चांगली असल्याने दहा किलोला 220 ते 260 रुपये दर मिळाला. तर, किरकोळ बाजारात मटारची 30 ते 40 रुपये किलो या दराने विक्री सुरू होती.

थंडीस सुरुवात होऊन उत्पादनावर परिणाम झाल्याने भेंडी, काकडी, दोडका व तोतापुरी कैरीची आवक रोडावली आहे. त्या तुलनेत आवक जास्त राहिल्याने त्याच्या दरात दहा टक्क्यांनी वाढ झाली. तर, मागणीअभावी पावट्याच्या भावात घसरण झाल्याचे सांगण्यात आले. रविवारी गुलटेकडी मार्केट यार्डातील तरकारी विभागात राज्यासह परराज्यातून 90 ट्रकमधून शेतमालाची आवक झाली. गत आठवड्याच्या तुलनेत दहा ट्रकने आवक घटल्याचे दिसून आले.

परराज्यांतून आलेल्या शेतमालामध्ये गुजरात व कर्नाटक येथून सुमारे 10 ते 12 टेम्पो हिरवी मिरची, आंध्रप्रदेश व तामिळनाडू येथून 3 ते 4 टेम्पो शेवगा, गुजरात येथून 2 टेम्पो भुईमूग शेंग, कर्नाटक येथून 3 ते 4 टेम्पो घेवडा, 100 क्रेटस् तोतापुरी कैरी, कर्नाटक व गुजरात येथून 4 ते 5 टेम्पो कोबी, बेंगलोर येथून 2 टेम्पो आले, राजस्थान येथून 9 ते 10 ट्रक गाजर, मध्य प्रदेश व पंजाब येथून 30 ट्रक वाटाणा तर मध्य प्रदेशातून लसणाची 10 ट्रक इतकी आवक झाली.

स्थानिक भागातून झालेल्या आवकेमध्ये सातारी आले सुमारे 800 ते 900 पोती, टोमॅटो 7 ते 8 हजार क्रेट्स, काकडी 7 ते 8 टेम्पो, फ्लॉवर 10 ते 12 टेम्पो, कोबी 5 ते 6 टेम्पो, ढोबळी मिरची 10 ते 12 टेम्पो, गवार 6 ते 7 टेम्पो, भेंडी 6 ते 7 टेम्पो, तांबडा भोपळा 10 ते 12 टेम्पो, कांदा 125 ट्रक यांसह आग्रा व इंदौर येथून बटाट्याची 30 ट्रक इतकी आवक झाली.

Back to top button