बांधकाम विभागाच्या अनेक रस्त्यांची दुर्दशा; आंबेगाव तालुक्यातील परिस्थिती | पुढारी

बांधकाम विभागाच्या अनेक रस्त्यांची दुर्दशा; आंबेगाव तालुक्यातील परिस्थिती

मंचर; पुढारी वृत्तसेवा : आंबेगाव तालुक्यात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने केलेल्या रस्त्याच्या कामांचा दर्जा चांगला नाही. अनेक रस्त्यांची दुर्दशा झाली असून, काही महिन्यांपूर्वीच नवीन बांधलेले रस्तेही खराब होऊ लागले आहेत. रस्ते बनवताना दर्जा तपासला जात नाही का, हा प्रश्न सर्वांना सतावू लागला आहे. अनेक ठेकेदार हे राजकीय नेत्यांशी संबंधित असल्याने रस्त्यांची कामे चांगल्या पद्धतीने न होता कमी दर्जाचे साहित्य वापरून रस्ते बनवले जातात का, हा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. रस्त्याच्या दुरावस्थेविरोधात नेतेही मात्र मौन बाळगून आहेत. शासनाने मोठ्या प्रमाणावर केलेला खर्च वाया गेला आहे. नागरिकांना मात्र खराब रस्त्यांचा मोठ्या प्रमाणावर त्रास होत आहे.

सध्या ऑनलाईन पद्धतीने अनेक कामांचे ठेके दिले जात असले, तरीही हे घेत असताना कमीतकमी रक्कम टाकलेल्या ठेकेदाराला शासन काम देत असते. अशावेळी काम मिळण्यासाठी अनेक ठेकेदार हे कमीत कमी रक्कम टाकून काम मिळवतात. 15 ते 20 टक्के रक्कम कमी करून काम घेतात. त्यानंतर राहिलेल्या रकमेतून त्यांना तो रस्ता बनवायचा असतो. त्याच पद्धतीने स्वतःसाठी ही काही रक्कम कमवायची असते.

त्याच पद्धतीने या कामातील अनेक अधिकारी, पदाधिकारी यांनाही काही रक्कम द्यावी लागते, असेही काही लोकांचे म्हणणे आहे. त्यामुळे एक लाख रुपयांच्या कामात पंधरा टक्के बिले, जीएसटी, पदाधिकारी, अधिकार्‍यांची टक्केवारी, कंत्राटदारांचा नफा आणि उरलेल्या पैशातून काम त्यामुळे अनेक कामांचा दर्जा घसरतो. त्यामुळे प्रशासनाने काम करत असताना सर्व गोष्टींवर नियंत्रण ठेवून काम केले, तर शासकीय कामे चांगले दर्जाची होतील. वारंवार त्याच रस्त्याची कामे करावी लागणार नाहीत.

अनेक ठेकेदार काम करतात परंतु, रस्त्याच्या कडेच्या साईडपट्ट्या, एखाद्या सिमेंटच्या कामात कमी सिमेंट वापरणे, त्या कामाला पाणी न मारणे अशा पद्धतीने पैसे वाचवले जातात. परिणामी, हे रस्ते किंवा बांधकाम लवकर खराब होतात. त्यामुळे शासकीय कामे स्थानिक ग्रामपंचायतींना माहिती देऊन होणे गरजेचे आहे. जेणेकरून ग्रामपंचायत किंवा त्या गावातील नागरिकांचे त्या कामावर लक्ष राहील.

ठेकेदार, नेत्यांचे साटेलोटे असल्याचा आरोप
अनेक रस्त्यांचे ठेकेदार हे राजकीय पुढार्‍यांचे जवळचे कार्यकर्ते आहेत. काही राजकीय नेतेमंडळी, अधिकारी, ठेकेदारांसोबत पार्टनरशिप करून रस्ते बनवतात. त्यामुळे रस्त्यांच्या कामाबाबत दर्जा राहत नाही. अधिकारीवर्गही कुठे ना कुठे या प्रकारात सहभागी होतो आणि नवीन बनवलेले रस्तेही लवकर खराब होतात. त्यामुळे प्रशासनाने रस्त्यांची कामे चांगल्या पद्धतीने तयार करून घेतली पाहिजेत, अशी मागणी होत आहे.

Back to top button