मंचर : बसशेडअभावी विद्यार्थ्यांचे हाल, ग्रामपंचायतीने निवारा शेड उभारावा : पालकांची मागणी | पुढारी

मंचर : बसशेडअभावी विद्यार्थ्यांचे हाल, ग्रामपंचायतीने निवारा शेड उभारावा : पालकांची मागणी

मंचर (ता.आंबेगाव); पुढारी वृत्तसेवा : अवसरी खुर्द, येथे बसशेड नाही. परिणामी विद्यार्थ्यांना भर उन्हात, पावसात उघड्यावरच उभे राहावे लागते. परिणामी विद्यार्थ्यांचे मोठे हाल होतात. विद्यार्थ्यांचे हाल टाळण्यासाठी ग्रामपंचायतीने बसस्थानक परिसरात प्रवाशांसाठी निवारा शेड उभारावे, अशी मागणी प्रवासी, कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी केली आहे.

अवसरी खुर्द हे मंचरपासून तीन किलोमीटर अंतरावर असल्याने गावातील मुले, मुली शिक्षण घेण्यासाठी मंचरला दररोज ये-जा करतात, तसेच गावात कामगारवर्ग मोठ्या प्रमाणात असून, येथील कामगार मंचर, खेड, चाकण, भोसरी येथे नोकरी, उद्योग, व्यवसायाकरिता दररोज ये- जा करत असतात. परंतु, अवसरी खुर्द येथे राज्य परिवहन महामंडळाचे बस निवारा शेड नसल्याने समस्या निर्माण होत आहे.

अज्ञात व्यक्तीने दोन वर्षांपूर्वी राज्य परिवहन महामंडळाची परवानगी न घेता एका रात्रीत ते पाडून टाकले. एसटी बसस्थानकाचे पत्रे, खिडक्या, दरवाजे अज्ञात व्यक्तीने चोरून नेले. मात्र, त्याचा शोध राज्य परिवहन महामंडळाने घेतला नाही. त्यानंतर अवसरी खुर्द ग्रामपंचायतीने निवारा शेडच्या रिकाम्या जागेत शिवस्मारक उभारले आहे. शिवस्मारकाचे काम अंतिम टप्प्यात आहे.

मंचर येथे नोकरी, व्यवसायाकरिता जाणार्‍या प्रवाशांना व तसेच कॉलेजला जाणार्‍या मुला, मुलींना निवा-याचे कोणतेच संरक्षण नसल्याने एसटी बसची वाट पाहावी लागत आहे. अवसरी खुर्द ग्रामपंचायतीने एसटी बसस्थानक परिसरात निवारा शेड उभारावे आणि प्रवाशांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी प्रवासीवर्ग करत आहे.

Back to top button